धाराशिव

Dharashiv News : आरक्षणाचा न्याय्य वाटा द्या; मातंग समाजाचा धाराशिवमध्ये महामोर्चा

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मातंग समाजाचा भव्य महामोर्चा काढण्यात आला.

पुढारी वृत्तसेवा

Give a fair share of reservation; Mahamorcha of Matang Samaj in Dharashiv

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : अनुसूचित जाती प्रवर्गातील आरक्षणाच्या वर्गीकरणाचा निर्णय तातडीने लागू करून मातंग समाजाला आरक्षणाचा न्याय्य वाटा द्यावा, या मागणीने गुरुवारी धाराशिव शहर दणाणून गेले. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मातंग समाजाचा भव्य महामोर्चा काढण्यात आला. घोषणांनी परिसर दणाणून सोडत हजारो समाजबांधवांनी सरकारचे लक्ष मागणीकडे वेधले.

धाराशिव जिल्ह्यासह सोलापूर आणि लातूर जिल्ह्यातील मातंग समाजबांधव मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या वर्गीकरणासंदर्भात निर्णय दिल्यानंतरही राज्य सरकारकडून त्याची अंमलबजावणी करण्याबाबत ठोस पाऊल उचलले जात नसल्याने समाजात नाराजी असल्याचे आंदोलकांनी सांगितले. अनुसूचित जातीतील सर्व उपजातींना समान न्याय मिळावा, तेही मुख्य प्रवाहात यावेत यासाठी उपवर्गीकर आवश्यक असल्याचे मत प्रमुख वक्त्यांनी व्यक्त केले.

मोर्चासाठी जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यांतूनही कार्यकर्ते, समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वजण हातात मागण्यांचे फलक तसेच महापुरुषांचे फोटो घेऊन 'आरक्षण आमच्या हक्काचे...' या घोषणा देत होते. अनुसूचित जाती प्रवर्गातील आरक्षणाचे अ, ब, क, ड नुसार वर्गीकरण करून प्रत्येक घटकाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाचा लाभ मिळावा, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली.

विशेषतः मातंग समाजाला आरक्षणातील न्याय्य वाटा मिळण्यासाठी राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आली. या ठिकाणी मातंग समाजातील विविध सामाजिक संघटना, नेते, पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. मोर्चादरम्यान विविध घोषणांमधून आरक्षणाच्या वर्गीकरणाची मागणी जोरकसपणे मांडण्यात आली.

सरकारने मागणीची दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा समाजबांधवांनी दिला. लोकशाही अण्णाभाऊ साठे चौकातून दुपारी हा मोर्चा निघाला. तो दुपारी तीनच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आला. तिथे मोर्चाचे सभेत रुपांतर झाले.

निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच'

आरक्षणाच्या वर्गीकरणाचा निर्णय होईपर्यंत आंदोलनाची धार कमी होणार नाही. शासनाने मागणीची तातडीने दखल घेऊन अंमलबजावणीचा निर्णय घ्यावा. अन्यथा आगामी काळात आणखी तीव्र आंदोलने आणि मोर्चे काढले जातील, असा निर्धार महामोर्चातील आंदोलकांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT