वीजपुरवठ्याच्या कमी दाबाविरोधात ग्रामस्थ आक्रमक pudhari photo
धाराशिव

Dharashiv News : वीजपुरवठ्याच्या कमी दाबाविरोधात ग्रामस्थ आक्रमक

गिरवली फाटा येथे रास्ता रोको; आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

पुढारी वृत्तसेवा

ईट : गेल्या काही वर्षांपासून मंजूर असूनही रखडलेले गिरवली फाटा येथील 33 केव्ही उपकेंद्र आणि शेतीपंपांना होत असलेल्या कमी दाबाच्या वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर सोमवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेस (अजित पवार गट) व ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ‌‘रास्ता रोको‌’ आंदोलन केले. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

ईट येथील वीज वितरण कंपनीच्या 33 केव्हीए क्षमतेच्या उपकेंद्रावरून 15 ते 17 गावांना घरगुती तसेच शेतीपंपासाठी वीजपुरवठा केला जातो. मात्र हा पुरवठा कमी दाबाने होत असल्याने शेतकरी व नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय गिरवली फाटा येथे मंजूर असलेले 30 केव्हीए उपकेंद्रही अद्याप सुरू झालेले नाही.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सुनील देशमुख व पंचायत समिती सदस्य बाळासाहेब खरवडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात ग्रामपंचायत सदस्य सयाजी हुबे, सरपंच संजय असलकर, इम्रान पठाण यांच्यासह कार्यकर्ते, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.दरम्यान, महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 15 दिवसांत मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले.

काय आहेत मागण्या

यावेळी गिरवली फाटा येथील 33 केव्हीए उपकेंद्राचे काम त्वरित सुरू करावे, अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या वीज वाहिन्यांची आणि खांबांची दुरुस्ती करावी, सिंगल फेजवरील भार कमी करण्यासाठी 100 एचपी आणि 25 एचपीचे नवीन ट्रान्सफॉर्मर बसवावेत, शेती पंपाला पूर्ण दाबाने 12 तास वीजपुरवठा करावा अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT