भूम: भूम तालुक्यात २१ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीकाठच्या हजारो हेक्टर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. तब्बल ७०२ हेक्टर शेती वाहून गेली असून, हजारो एकर क्षेत्र पाण्याखाली जाऊन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. या आपत्तीमुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून, “आता पुढे जगायचे कसे?” हा प्रश्न त्यांच्या डोळ्यांत अश्रूंनी दाटून आला आहे.
रामगंगा व बाणगंगा नद्यांनी २२ सप्टेंबर रोजी रात्रभर धोक्याची पातळी ओलांडल्याने चिंचपूरजवळील तब्बल ५०० मीटर रस्ता पुराच्या पाण्यात वाहून गेला. याच भागातील शेतकरी गणेश मोरे यांच्या घरात पाणी शिरले. घरातील सात सदस्यांना धाडसाने वाचवून मोठी दुर्घटना टळली, मात्र मोरे यांची तब्बल ३ एकर २० गुंटे शेती पूर्णतः वाहून गेली. यामध्ये दीड एकर द्राक्षबाग आणि खरीप पिके पूर्णतः नष्ट झाली.
मोरे व्यथित स्वरात म्हणाले, “जीव वाचला खरा, पण शेती नाही, बाग नाही, कमाई नाही. बँकेचे कर्ज कसे फेडायचे? कुटुंब कसे चालवायचे?” या पुरामुळे तालुक्यात फक्त शेतीच नव्हे तर जनावरांचेही मोठे नुकसान झाले आहे. तब्बल १४५ जनावरे दगावली, अनेक वाहून गेली तर काही जागीच मृत पडली. याशिवाय ३०७ घरांची परझड झाली असून नदीकाठच्या वस्तीतील नागरिकांवर विस्थापनाचे संकट ओढवले आहे.
एका रात्रीत होत्याचे नव्हते झाल्याने शेतकरी वर्ग निराश व हतबल झाला आहे. आयुष्यभराच्या कष्टाचे फळ पाण्यात वाहून गेल्याने शेतकरी वर्ग शासनाकडे मदतीची आस धरून आहे. “शासनाने तातडीने मदत केली नाही, तर भूम तालुक्यातील शेतकऱ्यांचे पुनर्वसन न होता ते पूर्णपणे उद्ध्वस्त होतील,” अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.