Dharashiv News : सोयाबीनचे नुकसान, चारा टंचाईने शेतकरी संकटात file photo
धाराशिव

Dharashiv News : सोयाबीनचे नुकसान, चारा टंचाईने शेतकरी संकटात

पालक सचिवांनी घेतला दुष्काळाचा आढावा, बसवंतवाडीत पाहणी

पुढारी वृत्तसेवा

Farmers in crisis due to soybean crop losses and fodder shortage

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : पावसाने दडी मारल्याने सोयाबीनच्या शेंगांमध्ये दाणे बारीक राहिले असून, उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे जनावरांसाठी चारा उपलब्ध नसल्याने पशुधन जगविण्याचे संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालक सचिव डॉ. राजेश देशमुख यांनी रविवारी (दि. १८) तुळजापूर तालुक्यातील बसवंतवाडी येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक नुकसानीची पाहणी केली.

शेतकरी देवानंद शिंदे यांनी ८ जुलै रोजी सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र, शेंगा भरण्याच्या काळात पाऊस न झाल्याने झाडांची वाढ खुंटली आणि दाणे बारीक राहिले. झाडांची उंची कमी असल्याने यंत्राद्वारे कापणी शक्य नसून, मजुरांकडून कापणीसाठी प्रतिहेक्टरी पाच हजार रुपये खर्च येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रब्बी हंगामासाठी विहिरीत पाणी नसल्याची अडचणही त्यांनी मांडली. दरम्यान, देवसिंग (तुळ) येथील दूध उत्पादक नेताजी जाधव यांनी सहा म्हशींच्या चाऱ्याचा प्रश्न मांडला. मका, ज्वारी आणि तुरीचे पीक पावसाअभावी वाळल्याने चारा टंचाई अधिक तीव्र झाली आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्यानंतर शासनाकडून मदत करण्यासाठी अद्ययावत याद्या तयार ठेवण्याच्या सूचना डॉ. देशमुख यांनी प्रशासनाला दिल्या. चाऱ्यालाही हमीभाव देण्यात येणार असून, जिल्ह्यात एक हजार ५०० एकर क्षेत्रावर चारा लागवडीचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सागर खटकाळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

सोयाबीन हातचे गेले, जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न! पावसाने शेंगा भरल्या नाहीत, दाणे बारीक राहिल्याने उत्पादन घटणार; वरून हाताने कापणीसाठी हेक्टरी पाच हजारांचा भुर्दंड. मका, ज्वारी, तुरीचे पीकही वाळल्याने पशुधन जगवायचे कसे, असा प्रश्न. या दुहेरी संकटातून दिलासा देण्यासाठी शासनाकडून मदतीचे आश्वासन, तर जिल्ह्यात दीड हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT