Farewell from Bhum Nagari to the Palkhi ceremony of Sant Balumama
भूम, पुढारी वृत्तसेवा : संत बाळूमामा आणि त्यांच्या दैवी मेंढरांच्या पालखीला भूम नगरीतून जल्लोषात निरोप देण्यात आला. भूममध्ये २३ जूनपासून १ जुलैपर्यंत भरलेल्या या नऊ दिवसीय पालखी मुक्कामात शहराचा संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हालेला होता.
श्री सदूरु बाळूमामा देवालय ट्रस्ट, आदमापूर (भुदरगड, कोल्हापूर) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नवव्या क्रमांकाच्या पालखीचा मुक्काम भूम येथे यंदा उत्साहात पार पडला. प्रत्येक दिवस भक्तिमय कार्यक्रमांनी भरलेला, दररोज सकाळी ९ वाजता श्रींची आरती व महाप्रसाद, संध्याकाळी ६ ते ७ हरिपाठ, तर सायंकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत बाळूमामांच्या चरित्रावर आधारित प्रवचन आयोजित करण्यात आले होते.
या प्रवचनांना कारभारी आप्पा माळी यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले. रोज रात्री ९ वाजता आरतीनंतर महाप्रसाद वितरण करण्यात येत होते. २५ जून रोजी अमावस्येनिमित्त विशेष महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या दिवशी विशेष कण्या व आंबील्याचा प्रसाद दिला गेला. हजारो भाविकांनी लाभ घेतला.
संपूर्ण तालुक्यातील आणि परिसरातील भाविकांनी मोठ्या श्रद्धेने या पालखीची सेवा केली. स्थानिक मान्यवरांनीही या धार्मिक सोहळ्यात सहभाग घेत आरती व महाप्रसादाचा मान स्वीकारला. प्रसाद दिलेल्या मान्यवरांचे कारभारी आप्पा माळी यांच्या हस्ते भंडारा देऊन स्वागत करण्यात आले.
बाळूमामांचे चरित्र आणि प्रेरणा, संत बाळूमामांचा जन्म ३ ऑक्टोबर १८९२ रोजी अकोळ (ता. चिकोडी, जि. बेळगाव) येथे धनगर समाजात झाला. प्राणिमात्रांवर प्रेम, सेवाभाव आणि पांडुरंगाची भक्ती हे त्यांच्या जीवनाचे सार होते. आदमापूर (जि. कोल्हापूर) येथे वयाच्या ७४व्या वर्षी त्यांनी संजीवनी महासमाधी घेतली. त्यांच्यासोबत त्या वेळी साडेबाराशे मेंढ्यांचा समूह होता. आज त्यांची संख्या लाखोंच्या घरात पोहोचली आहे.
पुढील मुकामः सोनगिरी वाकवड आषाढी एकादशीला विशेष सोहळा पालखीने पुढील प्रवासासाठी सोनगिरी वाकवड या गावाकडे प्रस्थान केले आहे. ६ जुलै रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी येथे भजन, कीर्तन, प्रवचन, धनगरी ओव्या, आरती व विविध भक्ती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पालखी संपर्क प्रमुख व कारभारी आप्पा माळी यांनी धूम व परिसरातील सर्व बाळूमामा भक्तांना सोनगिरी वाकवड येथे होणाऱ्या आषाढी भक्तिसोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.