chandrashekhar bawankule Pudhari
धाराशिव

Chandrashekhar Bawankule: धाराशिवमध्ये ड्रग्ज तस्कर प्रकरणातील आरोपीकडून महसूल मंत्र्यांचा सत्कार, बावनकुळेंनीही थोपटली पाठ

Dharashiv Chandrashekhar Bawankule latest News: सत्कार कार्यक्रमानंतर मंत्री बावनकुळे यांनी ड्रग्ज माफियाला जवळ बोलावून त्याची पाठ थोपटत कौतुक देखील केले

पुढारी वृत्तसेवा

धाराशिव: एकीकडे ड्रग्ज विरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे नेते, तर दुसरीकडे त्याच पक्षाचे मंत्री ड्रग्ज प्रकरणातील कथित मास्टरमाईंडकडून जाहीर सत्कार स्वीकारत आहेत. धाराशिवमध्ये एका सत्कार कार्यक्रमात घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याला निधी मंजूर झाल्याबद्दल गुरूवारी (दि.७ सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ड्रग्ज प्रकरणातील आरोपी विनोद उर्फ पिंटू गंगणे याच्या हस्ते सत्कार करण्यात झाला. या दृश्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच भाजपच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आरोपीच्या हस्ते क्रेनने हार, आमदारांचीही उपस्थिती

तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यासाठी 1650 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याबद्दल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा जाहीर सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे, 'पिंटू गंगणे मित्र परिवारा'ने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात, मोठ्या क्रेनच्या साह्याने बावनकुळे यांना हार घालण्यात आला.

ड्रग्ज माफियांच्या पाठीवर भाजपचा हात?

या सत्कारादरम्यान आमदार राणा जगजितसिंह पाटील हे देखील उपस्थित होते. धक्कादायक बाब म्हणजे, कार्यक्रमानंतर बावनकुळे यांनी आरोपी विनोद गंगणे याला जवळ बोलावून त्याची पाठ थोपटत कौतुक केले. या घटनेमुळे ड्रग्ज माफियांना भाजपचे मंत्रीच पाठीशी घालत आहेत का, असा सवाल उपस्थित केला जात असून एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.

काँग्रेसमधील मोठा नेता भाजपमध्ये कसा? बावनकुळेंनी फोडले गुपित

याच कार्यक्रमादरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका मोठ्या राजकीय घडामोडीवरील पडदा उचलला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे मानसपुत्र बसवराज पाटील यांच्या भाजप प्रवेशामागील गुपित त्यांनी उघड केले. बावनकुळे म्हणाले, "बसवराज पाटील यांनी अनेक वर्षे काँग्रेसमध्ये प्रामाणिकपणे काम केले, पण त्यांच्या कष्टाचे चीज झाले नाही. त्यामुळे त्यांनी कोणताही लोभ न ठेवता, केवळ एक कार्यकर्ता म्हणून काम करण्याची इच्छा व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्याकडे त्यांनी पदाची अपेक्षा न ठेवता प्रवेश करण्याची अट घातली आणि त्याच अटीवर आम्ही त्यांचा भाजपमध्ये प्रवेश करून घेतला."

शेतकऱ्यांसाठी AI, पण वादाचीच चर्चा जास्त

या दौऱ्याचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेला कार्यक्रम होता. धाराशिवमधील विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्यात ऊस शेतीसाठी उपयुक्त असलेल्या एआय (AI) तंत्रज्ञानाचा शुभारंभ बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतीतील एआय तंत्रज्ञानासाठी 13 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वादग्रस्त सत्कार आणि राजकीय गौप्यस्फोटामुळे मुख्य कार्यक्रम झाकोळला

रात्रीचे बारा वाजले तरी या कार्यक्रमाला हजारो शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. मात्र, शेतकऱ्यांच्या विकासासाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमावर वादग्रस्त सत्काराचे सावट पसरले. शेतकऱ्यांसाठीच्या तंत्रज्ञानाच्या उद्घाटनाचा मूळ कार्यक्रम या वादग्रस्त सत्कारामुळे आणि राजकीय गौप्यस्फोटामुळे झाकोळला गेला. रात्री उशिरापर्यंत शेतकऱ्यांची गर्दी जमवूनही, या दौऱ्याची चर्चा मात्र वेगळ्याच कारणांनी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT