अमेरिकन महिलेचे आपत्‍कालिन परिस्थितीत डाॅ. अंजली निंबाळकर यांनी वाचवले प्राण!  Pudhari Photo
धाराशिव

American Woman Life Saved |अमेरिकन महिलेचे आपत्‍कालिन परिस्थितीत डाॅ. अंजली निंबाळकर यांनी वाचवले प्राण!

गोवा ते दिल्ली विमान प्रवासात घडली घटना, महिलेने मानले डॉ. निंबाळकरांचे आभार

पुढारी वृत्तसेवा

शंकर बिराजदार

उमरगा : मुंबई जे जे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तथा उमरगा शहराचे रहिवासी असलेले दिवंगत कै. डॉ. रमेश पाटील यांची कन्या कर्नाटकातील खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी गोवा ते दिल्ली विमान प्रवासात एका अमेरिकन महिलेचे प्राण वाचविले. आकाशात उडणाऱ्या विमानात एका परदेशी तरुणीवर आपत्कालीन उपचार करून वैद्यकीय सेवेचे आगळे वेगळे दर्शन घडवत डॉ अंजली निंबाळकर यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचं कौतुक होत आहे.

या घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, गोव्याहून दिल्लीसाठी शनिवारी इंडिगोच्या विमानाने उड्डाण केले. त्यानंतर विमानात दहा मिनिटांनी जेनी नावाच्या एका ३४ वर्षीय अमेरिकन महिलेला अस्वस्थ वाटू लागले. आणि अचानक तिची प्रकृती बिघडली, आणि काही मिनिटांतच ती बेशुद्ध होऊन खाली कोसळली. तिला तातडीने वैद्यकीय मदतीची आवश्यकता होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, विमान कर्मचाऱ्यांनी प्रवाशांमध्ये कोणी डॉक्टर आहे का असे विचारले. याच विमानातून कर्नाटकमधील काँग्रेसच्या माजी आमदार डॉ अंजली निंबाळकर ह्या प्रवास करत होत्या.

राजकारणात येण्यापूर्वी त्या वैद्यकीय क्षेत्रात सक्रिय होत्या. त्यांनी या अमेरिकन महिलेची स्थिती पाहिली आणि तत्काळ आपल्या सीटवरून उठून परिस्थिती हाताळण्यास सुरुवात केली. डॉ निंबाळकर यांनी या महिलेला त्वरित सीपीआर देण्यास सुरुवात केली. त्यांनी जेनी हिला शुद्धीवर आणण्यासाठी आपलं सर्व वैद्यकीय कौशल्य पणाला लावत प्रयत्नांची पराकाष्ठा केली. डॉ अंजली यांच्या प्रयत्नांमुळे जेनी शुद्धीवर आली. जेनीची प्रकृती स्थिर स्थावर झाल्यानंतर डॉ.अंजली निंबाळकर आपल्या सीटवर जाऊन बसल्या. मात्र ३० मिनिटांनी जेनी हिची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली.

त्यानंतर डॉ. निंबाळकर त्वरित जेनीची प्रकृती स्थिर राखण्यासाठी मदत केली. दरम्यान, घाबरलेल्या जेनी हिने डॉ निंबाळकर यांचा हात पकडून 'तुम्ही कुठेही जाऊ नका', असे सांगितले. त्यानंतर डॉ निंबाळकर जेनी सोबत राहून विमानात उपलब्ध असलेल्या प्रथमोपचार उपकरणांचा वापर करून विमान प्रवासात दीड तास उपचार सुरू ठेवले. ‘केबीन क्रू‘ ने मुख्य वैमानिकांना या मेडिकल एमर्जन्सीची कल्पना दिली. त्यानंतर दिल्लीत विमान उतरताच अधिक उपचारांसाठी तात्काळ जेनीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ अंजली निंबाळकर यांनी प्रसंगावधान राखून वेळेत काळजीपूर्वक उपचार केल्यामुळे परदेशी युवतीवरील जीवाचा धोका टळला. डॉ अंजली निंबाळकर यांनी केलेल्या आपत्कालीन प्रसंगीच्या वैद्यकीय सेवेबद्दल, विमानातील सर्व प्रवाशी तसेच विमान कर्मचाऱ्यांनी उभे राहून टाळ्या वाजवून कौतुक केले.

एअर होस्टेसला डॉक्टरांसह रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यास सांगितले. सर्व फ्लाइट अटेंडंटनी सर्वोत्तम प्रयत्न केले. उड्डाणा दरम्यान मला शक्य तितकी मदत केली. विमानाला प्राधान्याने लँडिंग मिळाले. आणि रुग्णवाहिका तिला रुग्णालयात नेण्याची वाट पाहत होती. रुग्णवाहिकेत तिला निरोप देणे हा सर्वात आरामदायी अनुभव होता कारण ती आता चांगल्या हातात होती, या आशेने. तिच्याशी बोलताना तिने सांगितले की ती कॅलिफोर्नियाची आहे, दिल्लीत तिचे सासरे राहतात. तिच्या सासूबाईंचे नाव देखील डॉ.अंजली आहे. त्या देखील एक स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. हा एक योगायोग आहे.
डॉ अंजली निंबाळकर, माजी आमदार खानापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT