नळदुर्ग, पुढारी वृत्तसेवा: चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची धारदार शस्त्राने वार करून निघृण हत्त्या करण्याची दुदैवी घटना नळदुर्ग येथे घडली. पत्नीची हत्त्या केल्यानंतर पतीने स्वतःवरही शस्त्राने वार करून घेतल्याने तोही गंभीर जखमी झाला आहे.
नळदुर्ग येथील घरकुल मध्ये अब्दुल वहीद बिलाल कुरेशी (वय ४५) व त्यांची पत्नी सुलताना अब्दुल वहीद कुरेशी (वय ४०) हे आपल्या मुलांसह राहतात. कुटुंबाच्या उपजीवेकेसाठी घरकुल शेजारी असणाऱ्या नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालयासमोर त्यांनी चहाची टपरी लावली होती. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची चहाची टपरी याठिकाणी आहे. अब्दुल वहीद बिलाल कुरेशी हा आपली पत्नी सुलताना अब्दुल वहीद कुरेशी यांच्या चारीत्र्यावर संशय घेत होता. त्यामुळे त्यांच्यात भांडणे होत होती.
दि. ५ नोव्हेंबर रोजी नेहमीप्रमाणे त्यांची चहाची टपरी सुरू होती. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास या नवरा-बायकोमध्ये भांडण सुरू झाले हे भांडण इतके विकोपाला गेले की, संतप्त झालेल्या अब्दुल वहीद बिलाल कुरेशी याने त्याची पत्नी सुलतानावर कात्री व चाकूने सपासप वार केले. यामध्ये सुलतानाचा जागीच मृत्यू झाला. पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून अब्दुल यानेही वार करून घेतले. यामध्ये तोही गंभीर जखमी झाला.
या घटनेची माहिती तेथील नागरिकांनी पोलिसांना दिली घटनेचे गांभीर्य ओळखून नळदुर्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे, सहायक पोलिस निरीक्षक ईश्वर नागरे, साळुंके व पोलिस उपनिरीक्षक गिते हे तत्काळ घटनास्थळी जाऊन गंभीर जखमी झालेल्या अब्दुल वहीद बिलाल कुरेशी याला समोरच असणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याठिकाणी त्याच्यावर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी त्याला सोलापूर येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. अब्दुल व सुलताना यांना दोन मुले, दोन मुली आहेत.