धाराशिव : येथील करजखेडा गावात जमिनीच्या जुन्या वादातून बुधवारी दुपारी दुहेरी हत्याकांड घडले. कोयत्याने वार करून सहदेव पवार आणि त्यांची पत्नी प्रियंका पवार यांची हत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
करजखेडा येथील रहिवासी असलेले जीवन हरीबा चव्हाण आणि सहदेव पवार यांच्या कुटुंबांमध्ये जमिनीवरून अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. या वादातूनच यापूर्वी जीवन चव्हाण याच्याविरुद्ध कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. औरंगाबाद खंडपीठाकडून जामीन मिळाल्यानंतर तो कारागृहातून बाहेर आला होता. दरम्यान बुधवारी दुपारी करजखेडा गावातून जाणार्या लोहारा रस्त्यावर जीवन चव्हाण त्याच्या मुलासह अन्य तीन आरोपींनी आपल्या चारचाकीने सहदेव पवार आणि त्यांच्या पत्नी प्रियंका यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात ते दोघेही खाली पडले. त्यानंतर आरोपींनी त्यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. यात सहदेव आणि प्रियंका यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, घटनेची माहिती मिळताच बेंबळी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले असून फरार आरोपींचा तपास सुरु केला आहे. या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. आरोपींच्या शोधात अनेक पथके रवाना केली आहेत.