Dharashiv News : धाराशिवला मुसळधार पावसाने झोडपले, कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी केली पाहणी  File Photo
धाराशिव

Dharashiv News : धाराशिवला मुसळधार पावसाने झोडपले, कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी केली पाहणी

कळंब, वाशी आणि धाराशिव तालुक्यांमध्ये पावसाने हाहाकार उडवला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Dharashiva lashed by heavy rains, Agriculture Minister Datta Bharne inspected

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : गेल्या ४८ तासांपासून धाराशिव जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. विशेषतः कळंब, वाशी आणि धाराशिव तालुक्यांमध्ये पावसाने हाहाकार उडवला आहे. या पावसामुळे मांजरा नदीला आलेल्या पुरात एक शेतकरी वाहून गेल्याची दुर्देवी घटना घडली आहे.

यंदाच्या पावसाळ्यात सुरुवातीला कमी पाऊस झाल्यामुळे जिल्ह्याची वार्षिक सरासरी ५० टक्क्‌यांपर्यंतही पोहोचली नव्हती. परंतु, गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने सर्वत्र जोर धरला आहे. गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी पहाटेपर्यंत एकट्या कळंब तालुक्यात १६० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला, तर धाराशिव आणि वाशी तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. या पावसामुळे कळंब, वाशी, धाराशिव तसेच तसेच भूम आणि परंडा तालुक्यातील अनेक नद्या-नाले दुथडी भरून वाहिले, ज्यामुळे काही गावांचा संपर्क ८ ते १० तासांसाठी तुटला होता.

या जोरदार पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मांजरा आणि तेरणा नदीकाठी असलेल्या अनेक शेतकऱ्यांची पिके वाहून गेली आहेत. या पावसामुळे तेरणा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. तसेच परंडा तालुक्यातील चांदणी प्रकल्प आणि सीना-कोळेगाव धरणही भरले आहे. निम्न तेरणा प्रकल्पाचे १० दरवाजे उघडण्यात आले असून, धरणात पाण्याची आवक मोठ्या गतीने सुरू आहे.

पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी शनिवारी जिल्ह्याचा दौरा केला. त्यांनी वाशी तालुक्यातील काही ठिकाणी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नुकसानीची पाहणी करून मदत योग्य पद्धतीने पुरविण्याबाबत प्रशासनाला निर्देश दिले. या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीने मदत पुरवण्याचे आवाहनही त्यांनी केले. नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT