dharashiv zp election news
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठीचा प्रचार आता गती घेत असल्याचे चित्र आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे ठप्प झालेला प्रचार सोमवारी (दि. २) जिल्ह्यात सर्वत्र पुन्हा सुरू झाल्याचे पाहायला मिळाले.
अजित पवार हे जिल्ह्याचे जावई होते. तसेच जिल्ह्यातील दोन साखर कारखानेही ते चालवत होते. जिल्ह्यातील अनेक नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळे त्यांच्या निधनामुळे संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली होती आणि प्रचारही ठप्प झाला होता. मात्र, सोमवारी हा ठप्प झालेला प्रचार पुन्हा सुरू झाला आहे.
अजित पवार हे भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, ठाकरे शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे भूमचे माजी आमदार राहुल मोटे यांचे जवळचे नातेवाईक होते. या तिन्ही नेत्यांचे प्रभावक्षेत्र संपूर्ण जिल्ह्यात असल्याने साहजिकच अजित पवार यांच्या निधनामुळे प्रचाराला ब्रेक लागला होता. २८ ते ३१ जानेवारीदरम्यान सर्व प्रचार तोफा मूक झाल्या होत्या.
एक जानेवारीला रविवार असूनही म्हणावा तसा प्रचाराचा माहोल कुठेच नव्हता. सोमवारपासून मात्र यातील बहुतांश नेते जिल्ह्यात परतल्याने प्रचारासह निवडणुकीसाठी पूरक घडामोडींना वेग आला आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील, खासदार राजेनिंबाळकर यांच्यासोबतच ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार कैलास पाटील, शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. युती व आघाडीतील सर्व पक्ष प्रचारात सक्रिय झाले असून अपक्ष उमेदवारांचा प्रचार मात्र आधीपासूनच सुरू आहे.
वरिष्ठ नेत्यांची उणीव
अजित पवार यांच्या निधनामुळे सर्वच पक्षांचे राज्यस्तरीय तसेच वरिष्ठ नेते अद्याप जिल्ह्यात आलेले नसल्याने महायुतीतील स्थानिक नेत्यांवरच प्रचाराचा भार पडलेला आहे. काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काही गटांमध्ये सभा घेतल्या आहेत. भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे हे भूम तालुक्यात येऊन गेले आहेत. मात्र, आता शिंदे गटाच्या शिवसेना तसेच पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून वरिष्ठ नेते जिल्ह्यात येणार की स्थानिक नेते व उमेदवारांनाच 'किल्ला' लढवावा लागणार, याकडे कार्यकत्यांचे लक्ष लागले आहे.