Dharashiv Zilla Parishad's initiative is becoming a pioneer; Students focus on studies
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा: विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची सवय रुजविणे, वाढता स्क्रीन टाईम कमी करणे आणि कुटुंबातील संवाद अधिक सशक्त करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या 'संध्याकाळी ७ ते ९ टीव्ही-मोबाईल बंद' या अभिनव उपक्रमाला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या हद्दीतील ७१२ ग्रामपंचायतींमध्ये दररोज सायंकाळी सात वाजता ग्रामपंचायतीचा भोंगा वाजताच दोन तास अभ्यासासाठी वातावरण निर्माण होत आहे. अनेक गावांमध्ये हा उपक्रम आता केवळ शासकीय कार्यक्रम न राहता लोकचळवळीचे स्वरूप धारण करू लागला आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाचा प्रारंभ ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला होता. 'आपला जीव धाराशिव व्हिजन २०३०' या व्यापक संकल्पनेंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. उपक्रमानुसार दररोज सायंकाळी ७ ते ९ या वेळेत टीव्ही आणि मोबाईलचा वापर टाळून विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी केले आहे. या दोन तासांच्या कालावधीत शासकीय कर्मचारी गावांमध्ये जनजागृती करून उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
विशेष म्हणजे अनेक गावांतील पालकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून, ते स्वतःही मुलांसमवेत मोबाईल बाजूला ठेवून अभ्यासाचे वातावरण निर्माण करत आहेत. काही गावांमध्ये कुटुंबांनी 'मोबाईलमुक्त दोन तास' या संकल्पनेला प्रतिसाद देत प्रेरणादायी संदेश आणि अनुभव समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यास सुरुवात केली आहे.
त्यामुळे हा उपक्रम विद्यार्थ्यांपुरता मर्यादित न राहता कुटुंबातील संवाद आणि सामाजिक सहभाग वाढविणाऱ्या चळवळीचे रूप घेत आहे. वाढत्या डिजिटल वापराच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी जिल्हा परिषदेच्या पुढाकारातून समाजाने एकत्र येऊन उचललेले हे पाऊल चर्चेचा विषय ठरत आहे.
डिजिटल साधने ही शिक्षणासाठी आवश्यक असली तरी त्यांचा संयमी वापर आणि शिक्षणाला प्राधान्य देण्याचा संदेश या उपक्रमातून दिला जात आहे. दोन तास स्क्रीनपासून दूर राहून अभ्यास, कुटुंबीयांशी संवाद आणि वाचनाला वेळ देण्याची सवय विद्यार्थ्यांना लागल्यास त्याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर होऊ शकतो. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील हा प्रयोग इतर जिल्ह्यांसाठीही अनुकरणीय ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.