Crime News pudhari photo
धाराशिव

Dharashiv Crime: मुलं घराबाहेर खेळत होती, घरात सुरू होते पती-पत्नीमध्ये भांडण; पुढे जे घडलं त्याने पोलीसही हादरले

Dharashiv Todays News | कडाक्याचे भांडण, पतीने धारदार शस्त्राने वार करत पत्नीला संपवले; अन्‌ खुद्द पोलिस ठाण्यात हजर

पुढारी वृत्तसेवा

Dharashiv Crime News

लोहारा (धाराशिव) : तालुक्यातील लोहारा (खु.) येथे पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून जागेवरच खून केल्याची धक्कादायक घटना घडली. सोमवार (ता. २१ सप्टेंबर) रोजी दुपारी येथील एका साखर कारखान्यासमोर ही घटना घडली असून सौ. कमल आप्पाराव राठोड (वय ४५) असे मृत महिलेचे नाव आहे. घटनेनंतर आरोपी पतीने स्वतःवरही वार करून सरळ लोहारा पोलिस ठाणे गाठले.

लोहारा (खु.) येथे आप्पाराव राठोड (वय ५०) हा पत्नी कमल आणि दोन मुलांसह राहत होता. काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये वाद सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. दि. २१ रोजी सोमवारी दुपारी दोघांमध्ये पुन्हा कडाक्याचे भांडण झाले. त्यावेळी दोन्ही मुले घराबाहेर असताना आप्पाराव याने पत्नी कमल यांच्या पाठीत आणि पोटात धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यातच मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.

पत्नीवर हल्ला केल्यानंतर घाबरलेला पती आप्पारावने स्वतःवरही वार करून घेतले. त्यात जखमी झाल्याने त्याच अवस्थेत तो थेट लोहारा पोलिस ठाण्यात हजर झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याला उपचारासाठी लोहारा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार व तपासणीनंतर पुढील उपचारासाठी त्याला धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच लोहारा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय पवार, सहाय्यक उपनिरीक्षक सचिन केंद्रे यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला. या घटनेमुळे लोहारा परिसरात खळबळ उडाली आहे. सोमवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT