धाराशिव : पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे, भूजलपातळी वाढविणे आणि शेतीला शाश्वत पाण्याचा आधार देण्यासाठी जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांना गती देण्यात आली आहे. ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ आणि ‘नालाखोलीकरण व रुंदीकरण’ या योजनांतर्गत २०२३-२४ ते २०२५-२६ या कालावधीत ३०२ प्रकल्पांतून १७०.३८ लाख घनमीटर गाळ काढण्यात आला. हा गाळ ११ हजार ६०७ शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्यात आल्याने सुमारे १३ हजार १३८ हेक्टर मुरमाड व खडकाळ जमीन सुपीक झाली आहे.
गाळ काढल्याने धरणांची पाणीसाठवण क्षमता १३,१५० टीसीएमने वाढली आहे. या कामांवर ६०.४८ कोटी रुपये खर्च झाला असून, पात्र शेतकऱ्यांना २४.२३ कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. नालाखोलीकरणामुळे विहिरी व बोअरवेलच्या पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे.‘जलयुक्त शिवार अभियान २.०’ अंतर्गत जिल्ह्यात १६३ गावांची निवड करण्यात आली आहे.
विशेष निधीतील १,३७४ आणि अभिसरणातील ५,५४५ अशी एकूण ६,९१९ कामे मंजूर असून, त्यासाठी ७६.१४ कोटींचा आराखडा आहे. त्यापैकी ६,६९२ कामे पूर्ण झाली आहेत. या कामांमुळे ३,९१६.८० घनमीटर अतिरिक्त पाणीसाठा निर्माण झाला असून, ९३८.९० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे.
सिमेंट नाला बांध, कंपार्टमेंट बंडिंग, सलग व खोल समतल चर, गॅबियन बंधारे, रिचार्ज शाफ्ट आणि नाला खोलीकरण अशा कामांमुळे पाणी जमिनीत मुरण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे भूजलपातळी, सिंचन क्षमता आणि शेतीची उत्पादकता वाढण्यास मदत होत आहे.
‘गाळ शेतात, पाणी जमिनीत’
३०२ प्रकल्पांतून गाळ काढला
१७०.३८ लाख घनमीटर गाळ उपसा
११,६०७ शेतकऱ्यांना लाभ
१३,१३८ हेक्टर जमीन सुपीक
६,६९२ जलसंधारण कामे पूर्ण
९३८.९० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली