बाळासाहेब जाधवर
रत्नापूर: धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मध्यरात्री धडक कारवाई करत गोवा राज्यातच विक्रीस असलेली विदेशी दारू साठवणूक प्रकरण उघडकीस आणले. या कारवाईत सुमारे ९ लाख ४९ हजार ५९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मा. आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे (दक्षता व अंमलबजावणी), विभागीय उपआयुक्त संगीता दरेकर (छ. संभाजीनगर विभाग) तसेच अधीक्षक हर्षवर्धन शिंदे (राज्य उत्पादन शुल्क, धाराशिव) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. १४ मार्च २०२६ रोजी वाशी ते पारा रोडवरील सर्वे क्रमांक १६६ येथील कच्च्या बांधकामाच्या घरावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकला. या ठिकाणी गोवा राज्य निर्मित व केवळ गोव्यात विक्रीस असलेली विदेशी दारू अवैधरित्या साठवून ठेवण्यात आल्याचे आढळून आले. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली मारुती स्विफ्ट डिझायर (क्रमांक MH-12-NX-4536) ही चारचाकी कारही जप्त करण्यात आली.
या प्रकरणी आकाश कुमार शेरकर (वय २२, रा. वाशी), सुनिल सुरेश कवडे (वय ३५, रा. भवानीनगर, वाशी) यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत कलम ६५ (ई), ८०, ८१, ८३, ९० व १०३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मध्यरात्री १.३० ते पहाटे ४.३० या वेळेत करण्यात आली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ९,४९,५९० रुपये इतकी असल्याची माहिती विभागाने दिली.
आरोपींना वाशी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १६ मार्च २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई अधीक्षक हर्षवर्धन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्र. निरीक्षक बाळकृष्ण त्रिंबक ढोकरे यांच्या पथकाने केली. या पथकात ए. ए. गवंडी, टी. एच. नेर्लेकर, ए. सी. खराडे, ए. डी. गटकांबळे, संतोष कलमले, महिला जवान ऐश्वर्या इंगळे, संग्राम झेंडे, ज्ञानेश्वर गुंजाळ, चैतन्य मोरे यांचा सहभाग होता. पुढील तपास प्र.निरीक्षक बाळकृष्ण ढोकरे करत आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री याबाबतची माहिती नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला कळवावी, असे आवाहन अधीक्षक हर्षवर्धन शिंदे यांनी केले आहे.