Crime News  Pudhari
धाराशिव

Dharashiv Crime : शेतजमिनीच्या जुन्या वादातून पुतण्याकडून चुलत्याचा खून

उमरगा तालुक्यातील दावलमलिकवाडी येथील घटनेने खळबळ

पुढारी वृत्तसेवा

Umerga Land Dispute Case

उमरगा: सोनं लुटण्याच्या आणि नात्यांमधील प्रेम जपण्याच्या दसऱ्याच्या सणाला दावलमलिकवाडी (ता उमरगा) येथे रक्तरंजित वळण लागले. शेतजमिनीच्या जुन्या वादातून संतापलेल्या पुतण्याने सख्ख्या चुलत्याची धारदार हत्याराने वार करून हत्या केली. भरत गजेंद्र कवठे (वय ४७) असे मृताचे नाव आहे. नात्यांमधील विश्वासाला तडा देणाऱ्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत मुरूम पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, तालुक्यातील दावलमलिकवाडी येथील शंकर विलास कवठे आणि त्याचे चुलते भरत कवठे यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून शेतजमिनीवरून वाद सुरू होता. मंगळवारी, (दि. २०) दसऱ्याच्या दिवशी रात्री नऊ च्या सुमारास हा वाद पुन्हा उफाळून आला. त्याचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले.

यावेळी संतापाच्या भरात शंकर याने धारदार हत्याराने भरत यांच्यावर हल्ला केला. गंभीर वारांमुळे भरत यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दसऱ्याच्या दिवशी नात्यांमधील स्नेहाऐवजी वैराने टोक गाठल्याने गावावर शोककळा पसरली. घटनेची माहिती मिळताच मुरूम पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर मृतदेह उमरगा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. बुधवारी (दि. २१) दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, घटनेनंतर संशयित शंकर कवठे फरार झाला असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत संपते यांनीही घटनास्थळी भेट दिली. मृताची पत्नी सखुबाई कवठे यांच्या फिर्यादीवरून मुरूम पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT