सकाळ पासूनच मतदारांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसून आला.  Pudhari
धाराशिव

Umarga Municipal Election | उमरगा नगरपालिकेसाठी किरकोळ बाचाबाची वगळता शांततेत मतदान

दुपारी साडे तीन पर्यंत ५४.२१ टक्के इतकी मतदानाची नोंद झाली

पुढारी वृत्तसेवा

Umarga polling updates

उमरगा: नगरपालिकेच्या निवडणुकीत मंगळवारी (दि.२) सकाळ पासूनच मतदारांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसून आला. सकाळी मतदानाला प्रारंभ होताच मतदार केंद्रांकडे पोहोचले. दुपारी साडे तीन पर्यंत ५४.२१ टक्के इतकी मतदानाची नोंद झाली.

उमरगा नगरपालिका निवडणुकीतील नगराध्यक्ष व २२ नगरसेवक पदासाठी मतदान घेण्यात आले. अनेक मतदान केंद्रावर पुरुषांनी गर्दी केली होती. त्यामुळे अनेक मतदान केंद्रावर मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. यात तरुण मतदारांची संख्या लक्षणीय होती. तर प्रत्येक मतदान केंद्रावर भाजप राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना काँग्रेस, ठाकरे सेनेचे पदाधिकारी व बुथ एजंटची गर्दी दिसून आली.

सकाळच्या दोन तासांत ९.५१ टक्के व साडे अकरा वाजेपर्यंत २३.२३ टक्के मतदान झाले. त्यानंतर १५ टक्क्यांनी वाढ होत दुपारी दीडपर्यंत ३८.५१ टक्के मतदान झाले. तर दुपारी साडेतीन तीन वाजेपर्यंत ५४.२१ टक्के मतदान झाले. यात पुरुष ८ हजार ७२७ महिला ८ हजार ५०३ तर ४ इतर मिळून १७२३४ मतदारांचा समावेश आहे.

शहरातील आदर्श विद्यालयात खास महिलांसाठी मतदान केंद्र उभारण्यात आले होते. महिला मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावर आकर्षक रांगोळी, रंगीबेरंगी फुग्यांची भव्य आरास केल्याचे दिसून आले. या केंद्रावर सर्व महिला व पोलिस कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली होती. दुपारच्या सत्रात जेष्ठ नागरिक, दिव्यांग व महिला मतदारांचा चांगला प्रतिसाद होता. किरकोळ बाचाबाची वगळता मतदान शांततेत पार पडले.

नगरपालिकेच्या निवडणूकीतील भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हर्षवर्धन चालुक्य, शिवसेनेचे किरण गायकवाड व उबाठा सेनेचे अब्दुल रज्जाक अत्तार यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांनीही मतदानात भाग घेत इतरांनाही  मतदान करण्याचे आवाहन केले.

शहरातील प्रभाग ३/१ मतदान केंद्रात सकाळी मतदान सुरू झाल्यानंतर मतदान यंत्र वारंवार बंद पडले, त्यामुळे मतदान संथ गतीने सुरू होते. निवडणूक विभागाकडून त्वरित दुसरे मतदान यंत्र बसविण्यात आले. त्यानंतर सुरळीत मतदानाला सुरुवात झाली आणि मतदान वेग वाढला.

नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी ४ तर २२ नगरसेवक पदासाठी मतदान झाले. तर न्यायालयीन प्रक्रियेमुळे प्रभाग क्रमांक ४ ब, प्रभाग ५ अ, आणि प्रभाग क्रमांक ११ अ मधील प्रत्येकी एक अशा तीन जागांच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली. त्यानंतर निवडणूक विभागाने या तीन जागांसाठी सुधारीत कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार या तीन जागांसाठी २० डिसेंबर रोजी मतदान त्यानंतर संपूर्ण निवडणुकीची २१ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT