Umarga School Stationery Price Hike
शंकर बिराजदार
उमरगा : शहरातील इंग्रजी माध्यमाच्या काही शाळांकडून वह्या- पुस्तकांची छापील किमतीपेक्षा जादा दराने विक्री केली जात असल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे. या प्रकारामुळे संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. केवळ १२ ते १५ पुस्तकांच्या संचासाठी हजारो रुपयांची आकारणी केली जात असल्याचे समोर आले आहे.
शहरातील विविध माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षणासाठी दररोज हजारो विद्यार्थी ये-जा करतात. मात्र काही इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडून सुरू असलेल्या मनमानी कारभारामुळे पालकांना मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांना लागणारी पुस्तके ठराविक खाजगी पुरवठादारां कडून छापून घेऊन ती केवळ शाळेतच विकली जात आहेत.
त्यामुळे पालकांसमोर पर्यायच उरत नाही. या पुस्तकाच्या मुळ छापील किमतीवर स्टिकर लावून वाढीव दर आकारला जात आहे. तसेच काही ठिकाणी बिलांमध्ये पारदर्शकता नसून वह्या-पुस्तकांसोबत अनावश्यक साहित्य घेण्यासही भाग पाडले जात असल्याचे पालकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. कोणतीही सवलत न देता ‘मक्तेदारी’ पद्धतीने ही विक्री सुरू असून यात आर्थिक गैरव्यवहाराचा संशय व्यक्त होत आहे.
या संपूर्ण प्रकारामागे शाळेतील जबाबदार व्यक्तींचा हात असल्याचीही चर्चा पालकांमध्ये रंगली आहे.पालकांची अडवणूक होत असतानाही शिक्षण विभाग या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप तीव्र झाला आहे. तक्रारी असूनही ठोस कारवाई का होत नाही, असा सवाल पालक विचारत आहेत.
काही आर्थिक हितसंबंधामुळेच दुर्लक्ष केले जात आहे का, अशी शंका व्यक्त होत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, तसेच शिक्षण विभागाने तातडीने हस्तक्षेप करून पालकांची आर्थिक पिळवणूक थांबवावी, अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान याबाबत गट शिक्षणाधिकारी यांच्याशी फोनवरून संपर्क साधला ते बैठकीत असल्याचे सांगितले.
पुस्तके, शैक्षणिक तसेच अनावश्यक साहित्य केवळ शाळेतूनच खरेदी आणि सर्व व्यवहार रोखीने करण्याची सक्ती केली जात आहे. छापील किमतीवर स्टिकर लावून वाढीव दर आकारले जात आहेत. एवढ्यावरच न थांबता, फी थकीत असल्यास विद्यार्थ्यांना निकाल व उत्तरपत्रिका दाखवण्यास सरळ नकार दिला जात आहे. ‘आधी फी भरा, मगच निकाल’ अशी अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. शिक्षण हक्काच्या दृष्टीने हा प्रकार अत्यंत गंभीर आहे.- एक पालक, उमरगा
शहरातील काही शाळांमध्ये पुस्तकाच्या मूळ छापील किमतीवर नवीन स्टिकर लावून पुस्तके पालकांना विकली जातात अशी तक्रार बऱ्याच पालकांनी केली आहे. याबाबत गटशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी यांना बोलून या प्रकरणाची चौकशी करण्याची सूचना करणार आहे.आमदार प्रवीण स्वामी , उमरगा
शासनाच्या स्पष्ट निर्देशांनंतरही सक्तीची विक्री, रोख व्यवहार आणि निकाल रोखून धरणे हे सर्व प्रकार शिक्षण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेला तडा देणारे आहे. त्यामुळे याची शिक्षण विभागा कडून सखोल चौकशी करून कारवाई करण्यात येईल.उषा गायकवाड, जि प उपाध्यक्षा, धाराशिव