Dharashiv Crime News 
धाराशिव

Dharashiv Crime| उमरग्यात पेट्रोल पंपावर भरदिवसा थरार! लोखंडी रॉडने तरुणावर तिघांचा जीवघेणा हल्ला; परिसरात खळबळ

व्यावसायिक अन् नागरिकांमध्ये घबराट

पुढारी वृत्तसेवा

उमरगा : शहरातील बाह्यवळण रस्त्यालगत असलेल्या पेट्रोल पंपावर भरदिवसा तिघांनी लोखंडी रॉडने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात वसीम अब्दुल रहीम अत्तार (वय ३५) गंभीर जखमी झाले. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी क्षणात हल्ला चढवून घटनास्थळावरून पलायन केले. ही घटना बुधवारी (दि.२१) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. या थरारक घटनेने शहरात खळबळ उडाली असून, नागरिक आणि व्यावसायिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

उमरगा शहरातील सोलापूर- हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर बाह्यवळण रस्त्यालगत माजी नगराध्यक्ष रज्जाक अत्तार यांचा पेट्रोल पंप आहे. आज (बुधवारी) दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांचे पुतणे व वसीम अत्तार पेट्रोल पंपासमोर कर्मचाऱ्याशी बोलत बसले होते. याचवेळी एका दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना लक्ष्य केले. वसीम अत्तार यांना सावरण्याची संधीही न देता हल्लेखोरांनी लोखंडी रॉडने त्यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. अचानक झालेल्या या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. हल्ल्यानंतर तिन्ही हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले. जखमी वसीम अत्तार यांना उमरगा उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच उमरगा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हल्ल्याचा संपूर्ण प्रकार कैद झाला असून, या फुटेजच्या आधारे पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.

हुडी, चेहऱ्यावर कपडा; विना नंबरच्या दुचाकीवरून येऊन हल्ला

चेहरा ओळखू येऊ नये म्हणून तिन्ही हल्लेखोरांनी हुडी परिधान करून तोंडाला कपडा बांधल्याची प्राथमिक माहिती आहे. एकाच विना नंबरच्या दुचाकीवरून आलेल्या या तिघांनी थेट वसीम अत्तार यांच्यावर हल्ला चढविला आणि घटनास्थळावरून पोबारा केला. पूर्वनियोजित पद्धतीने हल्ला करण्यात आला होता का? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. सीसीटीव्ही फुटेजमधून हल्लेखोरांची ओळख पटविणे आणि त्यांच्या पलायनाचा माग काढणे, हे पोलिसांसमोरील महत्त्वाचे आव्हान आहे.

भरदिवसा महामार्गालगत हल्ला; पोलिसांसमोर तपासाचे आव्हान!

वर्दळीच्या राष्ट्रीय महामार्गालगतच्या पेट्रोल पंपावर भरदुपारी झालेल्या या हल्ल्याने कायदा - सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हल्लेखोर कोण, हल्ल्यामागील नेमके कारण काय आणि वसीम अत्तार यांना लक्ष्य का करण्यात आले, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा माग काढून त्यांना तातडीने जेरबंद करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT