Tuljabhavani Temple 
धाराशिव

Tuljabhavani Temple : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त देवी दर्शनार्थ तुळजापुरात भाविकांचा महापूर

भाविकांची सुरक्षा रामभरोसे

पुढारी वृत्तसेवा

तुळजापूर : देवदीपावली अर्थात् त्रिपुरारी पौर्णिमेचा योग साधत मंगळवारी लाखो भाविकांनी तुळजापूर नगरीत कुलधर्म, कुलाचार पार पाडीत श्री तुळजा भवानी मातेच्या दर्शनाचा लाभ घेतला. मंगळवारी कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी तुळशी विवाहाचा अखेरचा दिवस असल्याने तुळजापुरात असंख्य ठिकाणी राधा-दामोधर विवाह सोहळाही थाटामाटात पार पडला. कार्तिक शुध्द पौर्णिमेला देव दीपावली साजरी केली जाते. यानिमित्ताने सारा मंदिर परिसर दिव्यांच्या झगमगाटात उजळून निघाला.

वाढती गर्दी लक्षात घेवून भाविकांना मातेच्या महाद्वारातून प्रवेश बंद करून बीडकर पायरीमार्गे सोडण्यात येत होते. मातेच्या नित्य पूजेची घाट सकाळी ६ वाजता देवून मुख्य मूर्तीला पंचामृत अभिषेक सुरु झाले. ११ वाजेपर्यंत अभिषेक सुरू होते. त्यानंतर श्री तुळजाभवानी मातेची सालंकृत नित्योपचार पूजा पडली.

देवदीपावलीचा प्रारंभ, त्रिपुरारी पौर्णिमा आणि मंगळवार असा तिहेरी योगायोग जुळून आल्याने राज्यासह परराज्यातून मातेच्या दर्शनासाठी आज भाविकांची तुफान गर्दी उसळली होती. दर्शन मंडपाचे तिन्ही हॉल हाऊसफुल्ल झाले होते. सायंकाळी फटाक्यांची आतषबाजीही सुरू होती. श्री तुळजा भवानी मंदिरातील येमाई देवीच्या मंदिरात घटोत्थापन सोहळाही पार पडला. सायंकाळी श्री मंदिर परिसरात ‘आई राजा उदो उदो’ च्या जयघोषात मातेची छबिना मिरवणूक निघाली.

भाविकांची सुरक्षा रामभरोसे

मंगळवारी श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळलेली असताना ती नियंत्रणात आणण्यासाठी मंदिरात कुठलीही पोलिस यंत्रणा कार्यरत नव्हती. त्यामुळे भाविकांची सुरक्षा रामभरोसे सुरु असल्याचे दिसून येत होते. मंदिरातून बाहेर पडण्याच्या मार्गावर गर्दीमुळे मोठी अडचण निर्माण होत असताना मातेचे महाद्वार मंदिर प्रवेशासाठी बंद ठेवल्याने भाविकांतून तीव्र संताप व्यक्त होत होता. ऐन गर्दीत महिलांना कटू प्रसंगाना तोंड द्यावे लागले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT