Dharashiv Drought : धाराशिवसाठी उजनीतून एक टीएमसी पाणी मिळणार file photo
धाराशिव

Dharashiv Drought : धाराशिवसाठी उजनीतून एक टीएमसी पाणी मिळणार

जिल्ह्यातील तीव्र दुष्काळी परिस्थिती आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेऊन उजनी धरणातून धाराशिव जिल्ह्यासाठी एक टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Dharashiv to receive one TMC of water from Ujani

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील तीव्र दुष्काळी परिस्थिती आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेऊन उजनी धरणातून धाराशिव जिल्ह्यासाठी एक टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. पुढील नियोजित पिण्याच्या पाण्याच्या आवर्तनासोबत हे पाणी सोडण्याचे निर्देश जलसंपदा विभागाने दिले आहेत. याबाबत १७ नोव्हेंबर रोजी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना लेखी आदेश देण्यात आल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पातील धाराशिव उपसा सिंचन योजना क्रमांक दोनच्या पहिल्या टप्प्यांतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. उजनी जलाशयातून पाणी उचलून सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील सीना नदीवरील घाटणे बॅरेजमध्ये साठविण्यात येणार आहे. तेथून कृष्णा-मराठवाडा लिंकच्या पाच टप्प्यांतील उपसा सिंचन प्रणालीद्वारे धाराशिव जिल्ह्यातील तलावासह रामदरा आवश्यक साठवण तलावांमध्ये पाणी पोहोचविण्याचे नियोजन आहे. दुष्काळ पाहणी दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्ह्यातील गंभीर पाणीटंचाई मांडली होती.

जिल्ह्यात केवळ आठ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने पुढील दहा महिने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे कठीण असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मागणी मान्य केली. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून आदेश निर्गमित केला. गरज भासल्यास अतिरिक्त पाणी देण्याची तरतूदही करण्यात आली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील नागरिकांसह पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यास मदत होणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT