धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : ठाकरे कुटुंबियांमुळे मी दोनवेळा खासदार व एकदा आमदार झालो आहे. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे तसेच जिल्ह्यातील जनतेने दाखविलेल्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही, असे सांगत पक्षांतराच्या मुद्यावरुन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी ऑपरेशन टायगरची खिल्ली उडवली. हे ऑपरेशन राबवायचे असेल तर जिल्ह्यात दहशत माजवत असलेल्या यवतमाळच्या वाघाला व दोन बिबट्यांना पकडून दाखवा, अशा शब्दांत पालकमंत्र्यांना टोला लगावला.
‘आगामी काळात बघा कोण कोण शिवसेनेत येतेय ते...’, असे वक्तव्य पालकमंत्री तथा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रजासत्ताकदिनी केले होते. त्यामुळे ठाकरे शिवसेनेचे खा. ओमराजे तसेच आ. कैलास पाटील यांच्याबाबत संशय निर्माण करणार्या पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आ. पाटील तसेच खा. ओमराजे यांनी आपली भूमिका स्पष्ट करीत पक्षांतराचा मुद्दा खोडून काढला. आ. पाटील म्हणाले, की जिवावर उधार होऊन मी गुजरातला न जाता मागे निघून आलो होतो. ठाकरेंमुळे दोन वेळा आमदार होण्याची संधी मिळाली आहे. काल, आज अन् उद्याही मी ठाकरेंसोबतच असेन. विरोधात असलो तरी संघर्ष करु अन् मतदारसंघासाठी निधी खेचून आणू. त्यासाठी सत्तेसोबत जाण्याची गरज नाही. राज्यात सध्या ज्यांची सत्ता आहे तेच अस्वस्थ दिसत आहेत. त्यांच्यातील अस्वस्थता लपविण्यासाठी त्यांनी पक्षफोडीच्या चर्चा सुरु केल्या आहेत. वास्तविक आमचा एकही आमदार फुटणार नाही.
खा. ओमराजे म्हणाले, की ओमराजे काय आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. उदय सामंत त्यांना उपमुख्यमंत्री करण्याचे बिंग फुटल्यानंतर त्यांनी ठाकरेंची शिवसेना फुटणार असे सांगायला सुरुवात केली आहे. हे खोटे असून असे काहीच होणार नाही. पालकमंत्री सरनाईक यांचे नाव न घेता खा. ओमराजे म्हणाले, की ऑपरेशन टायगर राबवायचे असेल तर जिल्ह्यात धुमाकूळ घातलेले दोन बिबटे व वाघ यांना अगोदर पकडा.