भूम : परंडा तालुक्यातील साकत व अंतरगाव परिसरात सोमवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत २०० एकरांपेक्षा अधिक क्षेत्रावरील ऊस जळून खाक झाला. या दुर्घटनेत ७० ते ८० शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून केळीच्या बागा, ठिबक सिंचन संच, विहिरीवरील सौर पॅनेल, मोटारी आणि पाईपही जळाले आहेत. ऐन हंगामात वर्षभराची मेहनत डोळ्यादेखत राख झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
भूम तालुक्याच्या सीमेलगत असलेल्या साकत परिसरातील शेतात दुपारी अचानक आग लागली. जोरदार वाऱ्यामुळे आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. एका शेतातून दुसऱ्या शेतात आगीच्या ज्वाळा पसरत गेल्याने मोठ्या क्षेत्रावरील ऊस आगीच्या विळख्यात सापडला. ग्रामस्थ, शेतकरी आणि तरुणांनी उपलब्ध साधनांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाऱ्याचा वेग अधिक असल्याने आग आटोक्यात आणणे कठीण झाले. अखेर परंडा येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. जवान आणि ग्रामस्थांनी संयुक्तपणे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली.
या आगीत ऊस पिकासह सिंचनाची यंत्रणाही जळाल्याने शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त होत असली तरी नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. महसूल, कृषी आणि वीज वितरण विभागाने तातडीने पंचनामे करून सर्व बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांतून होत आहे.