तानाजी जाधवनळदुर्ग (जि. धाराशिव) : तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी पायी निघालेल्या भाविकांना ट्रकने चिरडल्याने एका भाविकाचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी (दि. २३) सकाळी आठ वाजून ५५ मिनिटांच्या सुमारास नळदुर्ग बायपास रस्त्यावरील बोरी नदीच्या पुलाजवळ, हॉटेल रायका परिसरात घडली. जखमींपैकी चौघांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे.
गुरुसिद्ध बाबुराव कुंभार (वय ३०, रा. बसवकल्याण) असे मृत भाविकाचे नाव आहे. संगमेश्वर बसवराज बेलरे (वय ३३), रोहन दशरथ हाचाटे (वय ३९), महादेव रामलिंगय्या मठपती (वय २१), विरेश हनुमंत कुंभार (वय ३४), विरेश रुद्रमणी चौधरी (वय २७) आणि मडीवल्लय्या चंद्रकांत जमादार (वय २४) अशी जखमींची नावे आहेत. हे सर्वजण कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील बसवकल्याण येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.तुळजापूरकडे पायी जात असताना ट्रकने (एमएच ०४ एनबी ९६७१) भाविकांना धडक दिली.
अपघाताची माहिती मिळताच स्वामी नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेसह १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने घटनास्थळी धाव घेतली. संस्थानच्या रुग्णवाहिकेतून तीन जखमींना, तर अन्य जखमींना १०८ रुग्णवाहिकेतून नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उपजिल्हा रुग्णालयात जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी सर्व जखमींना सोलापूर येथे हलविण्यात आले. या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली.