धाराशिव : जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाल्यानंतर तब्बल दोन महिन्यांच्या खंडानंतर पावसाचे पुनरागमन झाले आहे. अर्थात सोयाबीनसारखे नगदी पीक वाया गेल्यानंतर या पावसाचा आता केवळ उसासारख्या पिकांना फायदा होणार आहे.
जिल्ह्याकडे यंदा वरुणराजाने पाठ फिरवल्याने शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. केवळ जून महिन्यात काही दिवस तसेच जुलै महिन्यात आठ ते दहा दिवस हजेरी लावल्यानंतर पाऊस गायब झाला. पूर्ण ऑगस्ट महिना तसेच सप्टेंबरच्या १९ तारखेपर्यंत पाऊस आलाच नाही. परिणामी जिल्ह्याचे प्रमुख ठरलेल्या सोयाबीनच्या वाढीवर मोठा परिणाम झाला.
बहुतांश भागातील सोयाबीनचे पीक करपून गेले. जिथे काळी जमीन आहे तिथे सोयाबीन हिरवे दिसत असले तरी त्यात शेंगाच भरल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. रविवारपासून मात्र जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. हा पाऊस सर्वदूर नसला तरी विखुरलेल्या स्वरुपात भाग बदलत हजेरी लावत आहे. मंगळवारीही दुपारनंतर जिल्ह्याच्या अनेक भागात पाऊस झाला.
आज मुख्यमंत्री जिल्ह्यात
दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी सर्वच पक्षांंकडून आंदोलने व मागणी होत असतानाच बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा दौर्यावर येणार असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून सरकार शेतकर्यांना दिलासा देणार का याकडे लक्ष लागले आहे.