कारमधून गुटख्याची तस्करी 
धाराशिव

Dharashiv Crime : कारमधून गुटख्याची तस्करी; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

दोघांवर गुन्हा; उमरगा पोलीसांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

उमरगा : हैदराबादहून उमरगाच्या दिशेने येणाऱ्या कारमधून तब्बल १६ लाख ७ हजार २०० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला. राष्ट्रीय महामार्गावरील तलमोड चेक पोस्टवर शुक्रवारी (दि. १६) पहाटेच्या सुमारास सापळा रचून ही धडक कारवाई करण्यात आली. याप्रकरणी दोघांवर उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

याबाबत माहिती अशी की, हैदराबाद येथून उमरगाच्या दिशेने एका कारमध्ये गुटख्याची वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक प्रल्हाद सुर्यवंशी यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी शुक्रवारी (दि.१६) पहाटे तीन वाजता राष्ट्रीय महामार्गावरील तलमोड चेक पोस्टवर सापळा रचून नाकाबंदी केली. पहाटे पाचच्या हैदराबादहून उमरगाच्या दिशेने निघालेली कार आडवून पोलिसांनी तपासणी केली. यादरम्यान मागीलच्या सीटवर २४ गोण्या भरलेल्या आढळून आल्या. चालक मोहम्मद जमील मोहम्मद अहमद खान (रा. तेलंगणा) आणि त्याचा साथीदार अली खान (रा. हैदराबाद) यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलीसांचा संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी गोण्या उलगडून पाहिल्या असता गोण्यामध्ये गुटखा आढळून आला.

त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत ९ लाख ७ हजार २०० रुपये इतक्या किंमतीचा बनावट गुटखा तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ७ लाख रुपयांची कार असा १६ लाख ७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी अन्नसुरक्षा अधिकारी पल्‍लवी इंबडे यांच्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी व त्यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT