उमरगा : तालुक्यातील येणेगूर येथील कॅप्टन जोशी विद्यालयात शिकणाऱ्या २९ मुलींना अचानक डोकेदुखी, पोटदुखीसह मळमळीचा त्रास होत असल्याची घटना शुक्रवारी, (दि ०४) रोजी दुपारी बाराच्या सुमारास घडली. यातील चार मुलींना पुढील उपचारासाठी उमरगा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान दूषित आहार व पाण्यामुळे घडना घडली असल्याचा आरोप करत पालकांनी शाळेत एकच गर्दी करत तीव्र संताप व्यक्त केला.
तालुक्यातील येणेगूर येथील जोशी विद्यालयातील इयत्ता सहावी, सातवी, आठवी व नववी वर्गात शिकत असलेल्या एकूण २९ मुली दुपारी बाराच्या सुमारास पोटदुखी व मळमळ आदी त्रास सुरू झाला. तात्काळ शाळेतील शिक्षकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्राथमिक उपचार करून चार मुलींना पुढील उपचारासाठी उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. उर्वरित मुलींची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्ताची चाचणी करून आरोग्य विभागाच्या दाक्षतेखाली सहा वाजेपर्यंत ठेवण्यात आले.
या घटनेची माहिती वार्यासारखी गावात पसरताच शाळेत पालकांनी एकच गर्दी केली होती. या प्रकारामागे केवळ दुषित पोषण आहार व पाणी असल्याचा आरोप पालकांनी केला. दरम्यान मागील चार दिवसापासून विद्यार्थ्याना असा त्रास होत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ उमाकांत बिराजदार, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ लक्षण कुंडले, आकाश चव्हाण, पर्यवेक्षक एच ए थोरात आदींसह आरोग्य सेविका, आशा कार्यकर्ती यांच्या पथकाने तपासणी केली. तर गटशिक्षण अधिकारी अमर राजपूत, विस्तार अधिकारी दत्तात्रय जोशी, केंद्र प्रमुख अब्दुल कादर कोकळगावे आदींनी भेट देत विद्यार्थ्याना स्वच्छते विषयक सूचना केल्या.
शाळेत मागील काही महिन्यांपूर्वी एका संस्थेने पाणी शुद्धीकरण यंत्रणा दिली होती. अद्याप ती कार्यान्वित करण्यात आली नाही. विद्यार्थी पिण्यासाठी बोअरवेलचे पाणी वापरत आहेत. तर फिल्टर एका कोपऱ्यात धुळ खात पडले असल्याचे दिसत आहे.
शाळा परिसराची स्वच्छता, पाणी व अन्नाचा अहवाल येईपर्यंत पोषण आहार बंद करुन विद्यार्थ्याना शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, तसेच ज्या विद्यार्थ्यांना लक्षणे दिसत आहेत अशाना घरी आराम करण्यास सांगून घराजवळील परिसराचे सर्वेक्षण करण्याच्या सुचना दिल्या आहेत.-डॉ उमाकांत बिराजदार, तालुका आरोग्य अधिकारी, उमरगा