धाराशिव : शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या पिकअप वाहनाला झालेल्या भीषण अपघात झाला. या अपघातात १० ते १५ जण जखमी झाले. हा अपघात बुधवारी (दि.२९) रात्री उशिरा सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील आळणी पाटी परिसरात घडला. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उमरगा व औसा तालुक्यातील भाविक शिर्डीहून दर्शन घेऊन पिकअप वाहनातून आपल्या गावी परतत होते. आळणी पाटीजवळ त्यांच्या वाहनाला भरधाव टिप्परने धडक दिल्याने हा अपघात झाला. धडकेची तीव्रता इतकी होती की, वाहनातील अनेक भाविक जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने उपचारासाठी धाराशिव जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. सर्व जखमींवर उपचार सुरू असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण आणि जखमींची ओळख याबाबतची अधिकृत माहिती रात्री उशिरापर्यंत उपलब्ध होऊ शकली नव्हती. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.