उमरगा : धाराशिवच्या लातुर-कलबुर्गी मार्गावरील माडज पाटीजवळ पिकअप व दुचाकीचा सोमवारी (दि १७ ) सायंकाळी साडेसातच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघात तिघांचा जागीच मृत्यू असून एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमीवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, लातुरहून उमरग्याच्या दिशेने भरधाव वेगात निघालेल्या बोलेरो पिकअपने समोरुन येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील आकाश सुर्यकांत रामपुरे (वय २४) व दिपक गणेश रामपुरे (वय २६, दोघेही रा मंगरूळ ता. औसा जि. लातुर) व पिकअपमधील दिगंबर गिरजाप्पा कांबळे (वय ६२, रा येळी ता उमरगा) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर मारुती विश्वनाथ रेड्डी (वय ५२, रा येळी ता उमरगा) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात इतका भीषण होता की, अपघातात अक्षरशः दुचाकीचा चक्काचुर झाला आहे.
अपघात होताच पिकअप चालक घटनास्थळावरुन पसार झाला. दरम्यान अपघातानंतर या मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव शेलार, पोलिस निरिक्षक अश्विनी भोसले, सहाय्यक पोलिस निरिक्षक पी के कन्हेरे यांच्यासह पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देवून रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.