उमरगा - नगरपालिका निवडणुक निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. 
धाराशिव

Umaraga Municipal Council Election Result 2025 | उमरगा नगरपरिषदेत शिंदे गटाचे वर्चस्व, नगराध्यक्षपदी किरण गायकवाड

भाजपचे हर्षवर्धन चालुक्य यांचा ६ हजार २८४ मतांनी पराभव : नगरपरिषदेत सत्तांतर

पुढारी वृत्तसेवा

उमरगा : जिल्ह्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या उमरगा नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. यामुळे पालिकेत सत्तांतर झाले असून पुन्हा शिवसेनेने येथे सत्ता मिळवली आहे. यात शिवसेना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार किरण गायकवाड यांनी भाजपचे हर्षवर्धन चालुक्य यांचा ६ हजार २८४ मतांनी पराभव केला. तसेच शिवसेना व काँग्रेसनी विरोधी नगरसेवकांचा धुव्वा उडवत नगरपरिषदेवर सत्ता मिळवली.

उमरगा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासह एकूण २६ जागांसाठी ३१ हजार ७९२ पैकी २१ हजार २३९ इतके मतदान झाले होते. अंतुबळी सभागृहात रविवारी (दि २१ ) सकाळी दहा वाजता एकूण १२ टेबलावर ४ फेऱ्यातून मतमोजणी सुरू झाली. पहिल्या फेरीपासून नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना उमेदवार किरण गायकवाड यांनी २ हजार २२१ मतांची आघाडी घेतली. पहिल्या फेरीत उबाठा सेनेचे रज्जाक अत्तार १ हजार ३१८, शिवसेनेचे किरण गायकवाड ३ हजार ९७६, भाजपाचे हर्षवर्धन चालुक्य १ हजार ७४५, वंचीतचे प्रभाकर मजगे ४४ तर नोटाला २३ मते पडली.

त्यानंतर उर्वरित सर्व तीन फेऱ्यातूनही गायकवाड यांना मताधिक्य मिळाले. अखेरच्या फेरी पर्यंत मताधिक्यात वाढ होत ६ हजार २८४ मतांनी विजयी झाले. एकूण झालेल्या २१ हजार २३९ मतदान पैकी किरण गायकवाड शिवसेना (११ हजार ६६०), हर्षवर्धन चालुक्य भाजपा (५३७६), रज्जाक अत्तार उबाठा (४ हजार १३), प्रभाकर मजगे वंचित (१३६) मते मिळाली. दरम्यान किरण गायकवाड यांना विजयी घोषित करताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तर नगरसेवक पदाच्या मतमोजणीत शिवसेना १२ व काँग्रेस ६ आघाडीचे १८, भाजप ५ राष्ट्रवादी काँग्रेसच्या २ उमेदवारांनी विजय मिळवला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार गोविंद येरमे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी लक्ष्मण कुंभार यांनी काम पाहिले. पोलीस उपअधीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रल्हाद सुर्यवंशी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

पालिकेत सत्तांतर!

शिवसेना व काँग्रेस आघाडीने नगराध्यक्ष पदासह तब्बल १८ जागा जिंकत निर्विवाद बहुमत मिळवले आहे. यात शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवारांसह १२ तर काँग्रेस ६ जागा जिंकल्या. दुसरीकडे, भाजप राष्ट्रवादी काँग्रेस युतीला मोठा धक्का बसला असून, यात भाजपा ५ तर राष्ट्रवादी काँग्रेस २ अशा केवळ ७ जागांवर समाधान मानावे लागले आहे. पालिकेत सत्तांतर झाले असून पुन्हा शिवसेनेने येथे सत्ता मिळवली आहे. यापूर्वी काँग्रेस व भाजपाची सत्ता होती.

नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना मिळालेली मते!

अब्दुल रज्जाक अत्तार(उबाठा) - ४०१३

किरण गायकवाड (शिवसेना) - ११६६०

हर्षवर्धन चालुक्य (भाजपा) - ५३७६

प्रभाकर मजगे (वंचीत) - १३६

नोटा - ६४

पक्षीय बलाबल

किरण गायकवाड नगराध्यक्ष शिवसेना

शिवसेना पुरस्कृत एका अपक्ष उमेदवारासह- 12

काँग्रेस ०६

भाजपा ०५

राष्ट्रवादी ०२

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT