उमरगा : सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील जकेकूर येथील सोलापूरकडे जाणाऱ्या मार्गावरील जुन्या पुलाला डाव्या बाजूने मोठा तडा गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पूल संरचनेला लांबलचक भेग पडल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
उमरगा ते कर्नाटक सीमेपर्यंतच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्ता खचलेला असून खोल खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. दररोज रात्रंदिवस अवजड वाहनासह बस, ट्रक, खासगी बस, टमटम, ऑटो, मोटारसायकल आदी हजारो वाहनांची वर्दळ असलेल्या या मार्गावर वाहनांचे संतुलन बिघडून वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत.
सिमेंट काँक्रीटचा मुलामा देऊन पूल वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. यापैकी जकेकूर तलावा जवळील जुन्या पुलाला डाव्या बाजूने लांबलचक तडा गेला आहे. तत्काळ पूल दुरुस्ती आणि बंद पथदिव्यांबाबत उपाययोजना कराव्यात, अन्यथा मोठ्या घटनेची शक्यता नाकारता येत नाही, असे मत बाबा जाफरी यांनी व्यक्त केले.