धाराशिव : राष्ट्रीय महामार्गावर सांजा चौक ते टापरे बिल्डिंग या दरम्यान एका बिअरबार समोर सुरक्षा जाळी लावलेली नाही. तर या मार्गावर अनेक नाल्या फुटल्या असून डांबरीकरणाचा थरही टाकलेला नाही. Pudhari News Network
धाराशिव

Dharashiv News : अखेर 'त्या' बिअरबारसमोर सुरक्षा जाळीचा मार्ग मोकळा

त्रुटीची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतली दखल

पुढारी वृत्तसेवा

धाराशिव : सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हिस रोडचे काम संपत आले असले तरी अजूनही अनेक त्रुटी कायम आहेत. दरम्यान, सांजा चौक ते वरुडा चौक यादरम्यान, एका बिअरबारसमोर राष्ट्रीय महामार्ग व सर्व्हिस रोडच्या मध्ये सुरक्षा जाळी लावलेली नाही. त्याची दाखल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतली आहे. याबाबत तातडीने पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश कंत्राटदार आणि संबंधित समितीला दिले आहेत.

मागील दीड वर्षापासून सव्हिस रोडचे काम सुरू आहे. दरम्यान, सव्हिस रोड व राष्ट्रीय महामार्गादरम्यान सुरक्षा जाळी बसविण्याचे काम जवळपास संपले आहे. असे असले तरी वरुडा चौकातून सांजा चौकाकडे जात असताना एका बिअरबारच्या समोरच ही जाळी लावलेली नाही. त्यामुळे भविष्यात या ठिकाणी अपघातांचा धोका आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी यासंबंधीच्या तक्रारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे केल्या होत्या. तसेच दै. पुढारीनेही याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेऊन प्राधिकरणाचे सोलापूर येथील उपमहानिबंधक स्वप्नील कासार यांनी दि. ६ ऑक्टोबर रोजी कंत्राटदार डी. सी. अजमेरा तसेच या करारांतर्गत काम करणाऱ्या पथकाला पत्र दिले आहे. या तक्रारीची खातरजमा करून आढळलेल्या त्रुटीचा अहवाल फोटोसह सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

अनेकांची दादागिरी

या सर्व्हिस रोडचे काम करत असताना अनेक व्यावसायिक दादागिरी करीत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. काही व्यावसायिक आमच्या दुकानासमोर जाळी लावू नका, रस्त्याच्या डांबरीकरणाचे थर वाढवू नका, असे म्हणत शिवीगाळ करीत आहेत. त्यामुळे या समस्या उद्भवत असल्याचे सांगितले जात आहे.

अधिकाऱ्यांचे हवे लक्ष

या कामाची जबाबदारी सोलापूरच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे असली तरी सुरू असलेल्या या कामाकडे जिल्हाधिकाऱ्यांनीही लक्ष देण्याची मागणी होऊ लागली आहे.

अनेक त्रुटी कायम

या रस्त्यालगत केलेल्या नालीचे काम तकलादू झाले आहे. नालीवरील छत अनेक ठिकाणी फुटले असून नागरिकांना कसरत करावी लागत आहे. अनेक वाहने नालीत अडकून पडू लागली आहेत. श्री साई हॉटेलजवळील शिवनेरीनगरकडे जाणाऱ्या नालीवरील छत फुटल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.

काय आहे समस्या?

नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्व्हिस रोड व राष्ट्रीय महामार्गादरम्यान सुरक्षा जाळी लावली जाते. वरुडा चौकाकडून सांजा चौकाकडे जात असताना एका बिअर बारच्या समोरच ही जाळी लावलेली नाही. जाळी मुद्दाम टाळल्याने येथून रस्ता धोकादायक पद्धतीने ओलांडला जात आहे. परिणामी भविष्यात येथे अपघातांचा मोठा धोका आहे. तसेच याच ठिकाणी सर्व्हिस रोडवर डांबरीकरणाचा अंतिम थरही टाकलेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT