उमरगा : नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी निघालेल्या कर्नाटकातील दाम्पत्याच्या दुचाकीला भरधाव कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात पत्नीचा मृत्यू झाला, तर पती गंभीर जखमी झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी (दि. १४) सकाळी साडे सातच्या सुमारास सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील दाबका शिवारातील पाच पुलानजीक घडली. या अपघातात राजम्मा संजीव कल्लेमुळे (वय ५५) यांचा मृत्यू झाला. तर त्यांचे पती संजीव हणमंत कल्लीमुळे (वय ६५, रा. बसवकल्याण, जि. बीदर) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील कल्लीमुळे दाम्पत्य उमरगा शहरातील जावयाच्या भावाच्या अंत्यविधीसाठी मंगळवारी सकाळी (क्र. केए ५६ जे ६५१३) या दुचाकीवरून उमरग्याकडे येत होते. दाबका गावाजवळ असलेल्या पाच पुलानजीक ते पोहोचले असता, हैदराबाद कडून सोलापूरच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या (क्र. एमएच ०३ एफडी २७५२) कारने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. धडकेत दोघेही रस्त्यावर दूर फेकले जाऊन गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, दोन्ही गंभीर जखमींना तातडीने उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच राजमा कल्लीमुळे यांचा मृत्यू झाला होता. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. तर गंभीर जखमी संजीव कल्लीमुळे यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या प्रकरणाचा पुढील तपास उमरगा पोलीस करीत आहेत.
कारचालकाची तत्परता!
राष्ट्रीय महामार्गावरील अपघातानंतर काही काळ वाहतूक बंद असल्याने अनेक वाहन चालक घटनास्थळी थांबले होते. संबंधित कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढण्याऐवजी उलट, जखमी दाम्पत्याला तातडीने स्वतःच्या कार मधून उमरगा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघातानंतर जबाबदारी झटकण्या ऐवजी जखमींचे प्राण वाचविण्यासाठी दाखविलेल्या कार चालकाच्या तत्परतेचे कौतुक होत आहे. मात्र, या अपघातास कारणीभूत ठरलेल्या घटनेचा तपास पोलीस करीत आहेत.