Dharashiv Crime News : तुळजापुरात प्रेम प्रकरणाच्या संशयातून १८ वर्षीय तरुणाची हत्या file photo
धाराशिव

Dharashiv Crime News : तुळजापुरात प्रेम प्रकरणाच्या संशयातून १८ वर्षीय तरुणाची हत्या

मित्रालाही सलग दोन तास अमानुष मारहाण; पोलिसांनी ४ संशयितांना घेतले ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

Dharashiv News : 18-year-old youth killed on suspicion of love affair in Tuljapur

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : तुळजापूर शहरात दोन तरुणांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून; दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. प्रेम प्रकरणाच्या संशयातून हा अमानुष प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाबाबत तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

मिळालेल्या घटनास्थळावरून माहितीनुसार, समीर जब्बार पटेल असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अरबाज अफसर सय्यद याच्यावर धाराशिव येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी अरबाज सय्यद याने दिलेल्या माहितीनुसार, तो तुळजापूर शहरात चहा पीत बसला असताना तिघांनी त्याला जबरदस्तीने एका वाहनात बसवून निर्जन शेतात नेले. तेथे त्याच्या तोंडावर; पाठीवर लाथाबुक्क्यांनी गंभीर मारहाण करण्यात आली.

त्यानंतर संशयितांनी अरबाजच्या मोबाईलचा पासवर्ड घेऊन त्याची तपासणी केली. मोबाईलमध्ये आक्षेपार्ह काहीही आढळले नसतानाही त्याची मारहाण सुरूच ठेवण्यात आली. त्याच्या खिशातील १० हजार रुपये काढून घेतल्याचाही आरोप जखमीने केला आहे. 'तू आमच्या भागात कमावतोस; आमच्या मुलींना त्रास देतोस,' असे म्हणत सुमारे २ तास मारहाण करण्यात आल्याचे त्याने रुग्णालयात सांगितले.

यानंतर संशयितांनी समीर पटेल याला फोन करून त्या घटनास्थळी बोलावून घेतले. तो तेथे येताच १५ ते २० जणांच्या टोळक्याने समीरलाही बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या गंभीर मारहाणीत समीरचा मृत्यू झाला. यानंतर संशयितांनी अरबाजलाही मृत समजून तुळजापूर शहरातील वाहनतळ परिसरात टाकून पळ काढला. जखमी अवस्थेत अरबाजला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत.

दोन तास अमानुष मारहाण

संशयितांनी अरबाजला जबरदस्तीने शेतात नेऊन सुमारे २ तास अमानुष मारहाण केली. मोबाईल तपासल्यानंतर काहीही आक्षेपार्ह सापडले नाही, तरीही मारहाण थांबली नाही. यानंतर समीर पटेल याला बोलावून १५ ते २० जणांच्या टोळक्याने केलेल्या मारहाणीत त्याचा जीव गेला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT