नळदुर्ग : येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील प्रसिद्ध नर - मादी धबधबा वाहू लागला आहे. बोरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे गुरुवारी (दि. १४) अतिरिक्त पाणी सांडव्याद्वारे बोरी नदीच्या पात्रात आले. त्यानंतर हे पाणी किल्ल्यात आल्याने हा नयनरम्य देखावा पर्यटकांसाठी खुला झाला आहे.
ऐतिहासिक ठिकाण म्हणून ओळख असलेल्या नळदुर्ग किल्ल्याची स्थापना कला आणि स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना म्हणून ओळख आहे. किल्ल्यातील बोरी नदीवर बांधलेल्या सुंदर पाणी महालात हे पाणी येत असून, त्यामुळे धबधबा ओसंडून वाहत आहे.
दरवर्षी पावसाळ्यात राज्याच्या विविध भागांतून, तसेच आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणासारख्या राज्यांमधून मोठ्या संख्येने पर्यटक किल्ला पाहण्यासाठी येतात. पावसाळ्यात किल्ल्याचे सौंदर्य अधिकच खुलून येते. आता नर-मादी धबधबा सुरू झाल्यामुळे येत्या काळात पर्यटकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्यदिन तसेच शनिवार, रविवार सुटी असल्याने पर्यटकांची गर्दी वाढणार हे स्पष्ट असल्याने पोलिसांनी त्या दृष्टीने तयारी केली आहे.