MPSC paper leak protest pudhari photo
धाराशिव

MPSC paper leak protest : पेपरफुटीच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांचा जिल्हा कचेरीवर मोर्चा

एसआयटी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

धाराशिव : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विविध ऑनलाइन परीक्षांमध्ये पेपरफुटी होत असल्याच्या आरोपांच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. एमपीएससीचे अध्यक्ष व सचिव यांनी राजीनामा द्यावा, पेपरफुटीच्या प्रकरणांची एसआयटीमार्फत चौकशी करावी, तसेच दोषी अधिकारी, संबंधित कंपन्या आणि अन्य जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी युवासेना तालुकाप्रमुख राकेश सूर्यवंशी यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. २०२१-२२ पासून सुरू असलेल्या ऑनलाइन परीक्षांबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. नीट, एमपीएससी तसेच ड्रग इन्स्पेक्टर पदाच्या परीक्षांमधील कथित पेपरफुटीचीही सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

गोरगरीब विद्यार्थी दिवसाचे १२ ते १८ तास अभ्यास करून स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. मात्र, परीक्षांमधील पेपरफुटीच्या आरोपांमुळे मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या या प्रकारांची जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले.

परंडा येथील विद्यार्थी प्रथमेश देशमुख याचा संदर्भ देताना सूर्यवंशी म्हणाले, प्रथमेश हा दहावी व अकरावीमध्ये टॉपर, तर बारावीमध्येही उत्कृष्ट कामगिरी करणारा विद्यार्थी होता. स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार एक-दोन गुणांनी संधी हुकत असल्याने तसेच पेपरफुटीच्या बातम्यांमुळे तो निराश झाला. त्याच्या आत्महत्येकडे केवळ वैयक्तिक घटना म्हणून न पाहता, विद्यार्थ्यांना अशा परिस्थितीला सामोरे जाण्यास भाग पाडणाऱ्या व्यवस्थेचीही जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

पेपरफुटीच्या प्रकरणात संबंधित परीक्षा घेणाऱ्या कंपन्या व अधिकाऱ्यांची एसआयटीमार्फत चौकशी करावी, दोषींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत आणि दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. पेपरफुटीच्या आरोपांची चौकशी करून प्रामाणिकपणे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT