Dharashiv Heavy Rain news
लोहारा - सतत कोसळणाऱ्या अवकाळी व अतिवृष्टीमुळे लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, मूग व इतर पिकासह जवळपास सर्व पिके पाण्यात बुडून गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अनेकांच्या शेतात उभे पीक पूर्णतः उद्धस्त झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यासोबतच शेतकऱ्यांची घरे, जनावरे, गोठे व शेतमाल साठवणही पाण्याखाली गेल्याने ग्रामीण भागात हाहाकार माजला आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून पंचनामे सुरू करण्यात आल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात ही प्रक्रिया फार्स ठरत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ढिसाळ पद्धतीमुळे पंचनामे वेळेत होत नाहीत, त्याची माहिती सर्व शेतकऱ्यांना दिली जात नाही, पंचनामे झाले तरी वास्तव नुकसानाचे योग्य मूल्यमापन होत नसल्याने शेतकऱ्यांच्या मनात तीव्र संताप निर्माण झाला आहे. शेतात उभ्या पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे, पण पंचनाम्यात किती टके नुकसान दाखवले जाते. हे कळत नाही.
शेतकऱ्यांना स्वतःचा शेतातील फोटो काढून तलाठी कार्यालयात जमा करण्याचे सांगितले गेले, पण संपूर्ण शेतकऱ्यांना ही माहितीच नसल्याने शेकडो शेतकऱ्यांना फोटो देता आले नाहीत. पाऊस सर्वत्र पडलेला असल्यामुळे नुकसानही सर्वच शेतकऱ्यांचे झाले आहे. पंचनामा व कागदपत्रांचा खेळ कशासाठी खेळला जात आहे. याबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शेतकऱ्यांचा प्रश्न आता फक्त पिकांच्या नुकसानापुरता राहिलेला नाही, तर जीवनावश्यक प्रश्न बनला आहे. बँकांचे हप्ते कसे फेडायचे? जनावरांना चारा कुठून आणायचा? मुलांचे शिक्षण कसे करायचे? असे सवाल पीडित शेतकरी करत आहेत, सरकारकडून मदत केव्हा जाहीर होईल, याबाबत संभ्रमच आहे. मात्र पंचनामे व शासकीय प्रक्रिया यामुळे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या हाती मदत पोहोचण्यासाठी वेळ लागू नये.