धाराशिव : विविध मागण्‍यांसाठी जिल्‍हाधिकारी कार्यालयावर आलेल्‍या मोर्चात सहभागी मजूर महिला, संघटना पदाधिकारी.  pudhari photo
धाराशिव

Dharashiv Labour Protest : जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला हजारो मजुरांचा मोर्चा

रोजगार, २५ हजारांची आर्थिक मदत, बेरोजगार भत्त्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

धाराशिव : रोजगार हमी योजनेंतर्गत तातडीने काम उपलब्ध करून द्यावे, दुष्काळग्रस्त मजूर कुटुंबांना २५ हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी आणि बेरोजगार भत्ता लागू करावा, यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी मजदूर संघटनेच्या वतीने सोमवारी (दि. २) जिल्हाधिकारी कार्यालयावर काम मागणी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो महिला, पुरुष मजूर आणि ग्रामीण भागातील कष्टकरी सहभागी झाले होते.

महाराष्ट्राचे प्रमुख समन्वयक जीवन राठोड यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. रोजगार हमीची कामे, मजुरीवाढ, बेरोजगार भत्ता, जॉब कार्ड, ई-केवायसी, फेस अटेंडन्समधील तांत्रिक अडचणी आणि बँका व वित्तीय संस्थांकडून होणारी सक्तीची कर्जवसुली बंद करण्याच्या मागण्या यावेळी करण्यात आल्या.

यावेळी जीवन राठोड म्हणाले की, रोजगार हा मजुरांचा घटनात्मक आणि कायदेशीर हक्क आहे. तो शासनाचा उपकार नाही. वारंवार मागणी करूनही मजुरांना काम मिळत नाही. काम न मिळाल्यास देय असलेला बेरोजगार भत्ताही दिला जात नाही. शासनाने या प्रश्नांची तातडीने दखल घ्यावी. मागण्या मान्य न झाल्यास आगामी हिवाळी अधिवेशनावर राज्यस्तरीय मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला.

ज्येष्ठ कामगार नेते सुभाष लोमटे यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. मजुरांच्या हक्कांच्या लढ्यासाठी सर्व कामगार संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी प्रत्येक मजूर कुटुंबाला २५ हजार रुपये मदत, मागणीप्रमाणे तातडीने रोजगार, काम न मिळाल्यास बेरोजगार भत्ता, मोफत जॉब कार्ड व ई-केवायसी, महिला मजुरांसाठी योग्य काम, ग्रामपंचायतींमध्ये सार्वजनिक कामांचा आराखडा आणि प्रतिदिन ५०० रुपये मजुरी देण्याची मागणी करण्यात आली.

साप्ताहिक मजुरी जमा करावी, अशीही मागणी आहे. मोर्चाच्या आयोजनासाठी लक्ष्मी ठाकूर, विजय राजपूत, वर्षा वाघमारे आणि आम्रपाली कांबळे यांनी परिश्रम घेतले. रोजगार आणि आर्थिक न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT