दोन दिवस पहाटेच्या वेळी ढगफुटीसदृश्य पाऊस  Pudhari Photo
धाराशिव

Dharashiv Heavy Rain | दोन दिवस पहाटेच्या वेळी ढगफुटीसदृश्य पाऊस : आलूर परिसरात शेती बरबाद!

अनेकांच्या घरात शिरले पाणी : आलूर गावाला आले तलावाचे स्‍वरुप

पुढारी वृत्तसेवा

उमरगा : तालुक्यातील आलूर व परिसरात सलग दोन दिवस पहाटेच्या सुमारास तब्बल दोन तास ढगफुटीसदृश पावसाने झोडपून काढले. पावसाने शेकडो हेक्टर वरील काढणीला आलेल्या खरिप पिकांसह शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तर अनेकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले.

तालुक्यातील आलुर व परिसरात बुधवारी व गुरुवारी, (दि ११) पहाटे तीन च्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. पहाटे पाचपर्यंत तब्बल दोन तास ढगफुटी सदृश पाऊस झाला. पावसामुळे गावात तलावासारखी स्थिती निर्माण झाली आहे, पाण्याचा मोठा प्रवाह गावातील वाकडे वस्ती, बोळदे वस्ती, सेवालाल तांडा भागातील घरात घुसल्याने अनेकांच्या घरातील अन्न धान्य व संसारोपयोगी साहित्याचे मोठं नुकसान झाले आहे.

तर एका अंगणवाडीतील पोषण आहार व इतर साहित्य पाण्याखाली गेले आहे. या पावसांत अशोक बाळेकुळे यांच्यासह दोन घरांच्या भिंती कोसळून घराचं मोठं नुकसान झालं आहे. पावसाचे पाणी घरात पाणी शिरल्याने नागरिकांना सकाळ पर्यंत उघड्यावरच थांबावे लागले. तर पावसाने काढणीला आलेल्या उडीद, मूग सोयाबीन पिकाच्या शेतात पाणी शिरल्याने अक्षरशः शेताला तलावाचे स्वरूप आले आहे. यात शरणाप्पा काशेट्टी यांनी शेतात काढणी करून ठेवलेल्या सोयाबीनच्या पेंढ्या पाण्यात तरंगत होत्या. तर काढणीला आलेले तसेच काढणी करून उडीद, मूग, सोयाबीन पिकांच्या गंजी पाण्याखाली गेल्या आहेत. अनेकांच्या शेतीचे बांध फुटून शेतातील माती वाहून गेली आहे, परिसरातील नदी नाले मर्यादेपेक्षा अधिक क्षमतेने पाणी वाहत आहेत. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. प्रशासनाने शेती व घराचे पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी व नागरीकांतून होत आहे.

मुरुम महसूल मंडळात मागील वर्षी मोठं नुकसान झालं असताना नुकसान भरपाई अनुदानातून वगळले गेले. तरीही मोठ्या आशेने खरिप पेरणी केली, मात्र काढणी केलेलं सोयाबीन दोन दिवासाच्या पावसाने पाण्यात गेले. शासनाने पंचानामे करून नुकसान भरपाई तत्काळ नुकसान भरपाई द्यावी
शरणाप्पा काशेट्टी, शेतकरी
गावात सलग दोन दिवस पहाटेच्या सुमारास झालेल्या पावसाने शेतीसह गावात नुकसान झाले आहे. पाण्याच्या प्रवाहामुळे गाव आणि शेतशिवारात तलावासारखी स्थिती आहे. याची माहिती महसूल व कृषी विभागाला देण्यात आली आहे. तर आज जिल्हाधिकारी यांना पावसाने झालेल्या नूकसानी बाबत पत्र दिले आहे.
लिलावती जेऊरे सरपंच, आलूर
आलूर व परिसरात दोन दिवस पहाटेच्या सुमारास झालेल्या पावसाने शेती व घराचे नुकसान झाल्याची माहिती आहे, सध्या धाराशिव येथे प्रशिक्षणासाठी आलो आहे, त्यामुळे नुकसान सांगता येणार नाही, उद्या प्रत्यक्षात पाहणी व पंचनामा केल्यानंतर नेमकं शेती व इतर नुकसान समजेल.
परमेश्वर शेवाळे, तलाठी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT