धाराशिव : मागील तीन दिवसांपासून धाराशिव शहराजवळ दाखल झालेल्या पट्टेरी वाघाच्या मागावर वनविभागाची पथके तैनात असून कॅमेरे ट्रॅपही लावले आहेत. तर ताडोबाहून भटकलेला गवा रेडा आता बार्शीच्या (जि. सोलापूर) दिशेने सरकला असल्याची माहिती आहे.
यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून मुक्त संचार करीत पट्टेरी वाघ येडशीजवळ दाखल झाला आहे. बिबट्याच्या शोधासाठी लावलेल्या कॅमेर्यात हा वाघ कैद झाला. त्यानंतर वनविभागाने सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. येडशी अभयारण्य परिसरात कॅमेरे लावले असून त्याच्या हालचाली टिपण्याच्या प्रयत्न वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी करीत आहेत. यासाठी आवश्यक त्या यंत्रणाही मागवून घेण्यात आल्या आहेत, अशी माहिती वनविभागातील सूत्रांनी दिली.