धाराशिव : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पिके पुराने व अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झाली असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाचा आज चौथा दिवस होता. मात्र प्रशासनाने दखल न घेतल्याने संतप्त शेतकऱ्यांचा उद्रेक झाला.
आज आंदोलनादरम्यान काही शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कमानीवर चढले, तर एक महिला शेतकरी कार्यालय परिसरातील झाडावर चढून बसली. या सर्वांनी आत्महत्येचा इशारा दिल्याने प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. अमोल जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु आहे.
दरम्यान, याचवेळी नियोजन भवनात सुरू असलेल्या शासकीय कार्यक्रमात उपस्थित असलेल्या आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडे एका आंदोलक महिलेने थेट जाब विचारत प्रश्नांची सरबत्ती केली. या घटनेनंतर आमदार पाटील, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार व पोलिस अधीक्षक रीतू खोखर यांनी आंदोलकांशी संवाद साधला. मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये हेक्टरला ५० हजार रुपये मदत, ओला दुष्काळ जाहीर करणे, रब्बीसाठी मोफत खते-बियाणे, तसेच पुरात बळी गेलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना दहा लाख रुपये मदत अशा मागण्या आहेत. उपोषणस्थळी आमदार पाटील पोहोचल्यावर त्यांनी आंदोलकांना चर्चा करून आश्वासन दिल्यानंतर झाडावर व कमानीवर चढलेले शेतकरी खाली उतरले. काही वेळ तणावपूर्ण बनलेली परिस्थिती अखेर नियंत्रणात आली. या वेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.