धाराशिव : घरी बसून आकर्षक पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगारांनी धाराशिव जिल्ह्यातील एका तरुणाला आणि त्याच्या वडिलांना तब्बल ४ लाख ४८ हजार ३१० रुपयांचा गंडा घातला आहे. टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून ही फसवणूक करण्यात आली असून, याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कौडगाव (ता. जि. धाराशिव) येथील रहिवासी भालचंद्र नरहरी गंगावणे (वय ६३) यांच्या मुलाला एका अज्ञात मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधण्यात आला. भामट्यांनी त्याला 'द रॉयल मिंट ७७५८' नावाच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये समाविष्ट केले. या ग्रुपवर मोठ्या पगाराच्या नोकरीचे प्रलोभन दाखवण्यात आले होते. सुरुवातीला विश्वास संपादन करून, काम देण्याच्या बहाण्याने विविध तांत्रिक कारणे सांगून वारंवार पैसे भरण्यास भाग पाडले.
नोकरीचा मोबदला आणि भरलेल्या रकमेवर मोठा परतावा मिळेल, असे खोटे आश्वासन सायबर भामट्यांनी दिले. या आमिषाला बळी पडून फिर्यादी आणि त्यांच्या मुलाने वेळोवेळी एकूण ४,४८,३१० रुपये संबंधितांच्या खात्यावर जमा केले. मात्र, इतकी मोठी रक्कम भरूनही कोणताही मोबदला मिळत नसल्याचे आणि संपर्क होत नसल्याचे लक्षात येताच आपली फसवणूक झाल्याचे गंगावणे कुटुंबाला उमजले.
फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर भालचंद्र गंगावणे यांनी २६ फेब्रुवारी रोजी धाराशिव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, सायबर पोलीस या प्रकरणाचा तांत्रिक तपास करत आहेत.
ऑनलाईन नोकरीच्या कोणत्याही आमिषाला सहजासहजी बळी पडू नका. कोणतीही कंपनी नोकरी देण्यापूर्वी पैशांची मागणी करत नाही. अज्ञात टेलिग्राम ग्रुप किंवा लिंकवर क्लिक करून आपली गोपनीय माहिती शेअर करू नका आणि कोणतीही रक्कम भरण्यापूर्वी संबंधित संस्थेची अधिकृत खातरजमा करा, असे आवाहन सायबर पोलीस विभागातर्फे करण्यात आले आहे.