भूम : शहरात भरदिवसा घडलेल्या अपहरणाच्या घटनेमुळे काही काळ खळबळ उडाली होती. मात्र भूम पोलीस व विशेष भरारी पथकाने अवघ्या पाच तासांत अपहृत शिक्षकाची सुखरूप सुटका करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
या प्रकरणी पोस्टे भूम गुरन येथे गुन्हा क्रमांक २४९/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS 2023) कलम १४०(३), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी शितल शिवाजी ओगले (वय ५४, व्यवसाय शिक्षिका, रा. कुसुमनगर, भूम) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ही घटना घडली. २५ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे १.२३ वाजण्याच्या सुमारास भूम येथील पोस्ट ऑफिससमोर शिवाजी मालोजी ओगले (वय ५४) हे उभे असताना एक अनोळखी महिला व तीन इसमांनी त्यांच्यावर विनाकारण मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी त्यांना जबरदस्तीने पांढऱ्या रंगाच्या ईको कंपनीच्या व्हॅन (क्र. MH16 CV 1697) मध्ये टाकून अपहरण करत अज्ञात स्थळी नेले.
घटनेची नोंद दुपारी ४.१६ वाजता होताच पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजची पाहणी, वाहनाचा मागोवा तसेच संशयितांचा शोध घेण्यासाठी दोन विशेष पथके तयार करण्यात आली. तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी बीड येथे शोधमोहीम राबवली. अवघ्या पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पोलिसांना बीड येथे अपहृत शिवाजी ओगले यांचा शोध घेण्यात यश आले असून त्यांच्या तावडीतून सुरक्षित सुटका करण्यात आली. या जलद कारवाईमुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला असून पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या धाडसी कारवाईत पोलीस उपनिरीक्षक बळीराम बंदखडके, पोलीस अमलदार शबाना मुल्ला मॅडम, पोलीस कर्मचारी अमोल कवडे, मनोज यादव व पोहे. शेख यांनी सहभाग घेतला. अपहरण प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.