उमरगा : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील हिप्परगाराव वाडी शिवारात गांजाची बेकायदा लागवड आणि साठवणुकीचा धक्कादायक प्रकार सलग दुसऱ्या दिवशी उघडकीस आला आहे. शुक्रवारी दोन स्वतंत्र कारवायांत सव्वातीन कोटींचा गांजा जप्त केल्यानंतर शनिवारी, (दि १०) पुन्हा पोलिसांनी छापा टाकून २२ लाख ६८ हजार ५०० रुपये किमतीचा ४५ किलो ७९० ग्रॅम गांजा जप्त केला. अवघ्या दोन दिवसांत तीन कारवायांत तब्बल ६ क्विंटल ८७ किलो ७९० ग्रॅम गांजा हाती लागल्याने सीमावर्ती भागातील गांजाच्या बेकायदा लागवडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील अंमली पदार्थ विरोधी पथकाने शुक्रवारी हिप्परगाराव वाडी येथील कन्हैया भांगे यांच्या सर्व्हे क्रमांक ४७/१३ मधील शेतावर छापा टाकून ३ क्विंटल ४४ किलो गांजा जप्त केला. त्याची किंमत सुमारे १ कोटी ७२ लाख रुपये होती. त्याच दिवशी उमरगा पोलिसांनी शिवाजी यंपाळे यांच्या घराजवळील शासकीय गायरान जमिनीवर कारवाई करत २ क्विंटल ९८ किलो वजनाचा, सुमारे १ कोटी ४९ लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला.
या दोन कारवायांमधून ६ क्विंटल ४२ किलो गांजा जप्त करण्यात आला होता. या कारवायांना चोवीस तास उलटण्यापूर्वीच शनिवारी पुन्हा गांजाचा साठा सापडला. हिप्परगाराव वाडी येथील गायरान गट क्रमांक ३९/२/१ मधील जमिनीवर विठ्ठल खवडे याने गांजाची लागवड केली होती. पोलिसांच्या कारवाईची चाहूल लागल्याने त्याने गांजाची झाडे उपटून काढली आणि चार गोण्यांत भरून साडीने झाकून ठेवल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांना मिळाली.
याच्या आधारे पोलिसांनी तत्काळ स्वतंत्र कारवाईचे नियोजन केले. नायब तहसीलदार प्रवीण काबरे, शासकीय पंच आणि फॉरेन्सिक पथका च्या उपस्थितीत छापा टाकण्यात आला. यावेळी गोण्यांत सुकवून ठेवलेला ४५ किलो ७९० ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी २२ लाख ६८ हजार ५०० रुपये किमतीचा हा साठा जप्त केला. याप्रकरणी पोलीस हवालदार चैतन्य कोनगुलवार यांच्या फिर्यादीवरून विठ्ठल बसप्पा खवडे याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत भराटे पुढील तपास करीत आहेत. सलग तीन कारवायांमुळे गांजा लागवड आणि साठवणुकीचे गांभीर्य समोर आले आहे. तर गावातून अनेकांनी धूम ठोकली असून या प्रकारामागे आणखी कोणी सहभागी आहे का, तसेच बेकायदा लागवडीचे जाळे किती खोलवर पसरले आहे, याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे.
तीन छापे, साडेतीन कोटींचा गांजा; पोलिसांचे नेमके चाललेय तरी काय?
हिप्परगाराव वाडीत सलग तीन कारवायात तब्बल ६ क्विंटल ८७ किलो गांजा जप्त करण्यात आला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर गांजाची लागवड आणि साठवणूक सुरू असताना बीट अंमलदारांचे डोळे झाकलेले होते का? गुन्हे प्रकटीकरण पथकाला याचा सुगावाही का लागला नाही? बाहेरील पथकांना गांजाचे साठे सापडतात, मग स्थानिक यंत्रणा काय करत होती? हा केवळ योगायोग की कर्तव्यातील गंभीर कसूर? या सलग कारवायांनी पोलिसांच्या डि बी पथक आणि गुप्तवार्ता यंत्रणेचे अक्षरशः वाभाडे निघाले असल्याचे बोलले जात आहे. आता जबाबदारी निश्चित होणार की प्रकरणावर पडदा पडणार?