भूम : भूम शहरात अत्यंत शिताफीने घडवून आणलेल्या चोरीच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. वाशी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी अर्जुन सुंदरराव मार्कड (रा. सोनगिरी) यांच्याकडील चार लाख रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. विशेष म्हणजे, ही घटना भरदिवसा घडल्याने पोलिस प्रशासनासमोरही मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन मार्कड यांनी भारतीय स्टेट बँकेत सोनं तारण ठेवून चार लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. ही रक्कम घेऊन ते पत्नीसमवेत दुचाकीवरून जात असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुचाकीला पंक्चर केले. त्यानंतर पुढे एका ठिकाणी त्यांच्या पत्नीच्या अंगावर अज्ञात पदार्थ अथवा औषध फवारण्यात आल्याने त्यांना तीव्र खाज सुटू लागली.
या प्रकारामुळे घाबरलेल्या मार्कड दाम्पत्याने तत्काळ भूम ग्रामीण रुग्णालय गाठले. उपचारासाठी रुग्णालयात गेल्यानंतर त्यांनी दुचाकी (एमएच ३३ ई २०५७) बाहेर उभी केली होती. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी अवघ्या पंधरा मिनिटांत दुचाकीच्या डिक्कीचे लॉक प्रथम चावीने उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र लॉक न उघडल्याने स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने डिक्की फोडून त्यामधील चार लाख रुपयांची रोकड चोरून नेली.
ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. भूम पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संजय जराड यांनी ग्रामीण रुग्णालय परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पुढील तपास सुरू केला आहे.
“घटनेच्या अनुषंगाने ग्रामीण रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून संबंधित मार्गावर कॅमेरा आहे का याची पडताळणी सुरू आहे. अज्ञात चोरट्यांविरोधात फिर्याद प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येईल.”—भूम पोलीस उपनिरीक्षक संजय झराड