Dharashiv Congress Dry Drought Demand
धाराशिव : पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप पिके वाळून गेली असून, शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे धाराशिव तालुक्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा, पीक अनुदान व आर्थिक मदत द्यावी, अशी आग्रही मागणी धाराशिव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली. तालुकाध्यक्ष विनोद वीर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. ७) तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांत पावसाने मोठा खंड दिल्याने खरीप पिकांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. पावसाअभावी पिके करपली असून, शेतकऱ्यांचा पेरणीपासूनचा खर्च वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे हिरवा चारा उपलब्ध नसल्याने पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे.
शासनाने विलंब न करता तालुक्यातील पिकांचे तातडीने पंचनामे करावेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा व अनुदान देऊन आर्थिक मदत करावी, तसेच पशुधनासाठी चारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर, माजी जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, धनंजय राऊत, खलील सय्यद, जावेद काझी, बालाजी हूबाले, बाळासाहेब मोरे, संजय गजधने आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.