Dharashiv Collector Dance Viral Video
धाराशिव: मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला असल्याने, पूरग्रस्त धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. शेतजमिनी, पिके, जनावरे आणि उपजीविकेची साधने वाहून गेल्याने शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले आहेत. अशा अत्यंत गंभीर परिस्थितीने शेतकऱ्यांचे संसार उध्वस्त झाले असताना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार मात्र एका कार्यक्रमात नाच-गाण्यात व्यस्त असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
धाराशिवमध्ये लाखो हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहेत. पुरामुळे अनेक तालुक्यांमध्ये शेतकरी अडचणीत सापडले आहेत, अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने अशा वेळी तातडीने मदतीसाठी धावून जाणे अपेक्षित असताना, धाराशिवचे जिल्हाधिकारी तुळजापुरातील एका कार्यक्रमात बेधुंद डान्स करताना दिसल्याने नागरिकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
जिल्ह्याची इतकी भयंकर परिस्थिती असताना, जिल्हाधिकाऱ्यांचे हे बेजबाबदार वर्तन अत्यंत आक्षेपार्ह आहे, अशी टीका सर्व स्तरांतून होत आहे. एका बाजूला बळीराजा संकटात सापडला असताना, जिल्हाप्रमुख म्हणून काम पाहणाऱ्या अधिकारी अशा प्रकारे आनंदात रमल्याने, प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने पसरत असून, 'तिकडे शेतकरी हवालदिल, अन् इकडे जिल्हाधिकारी डान्समध्ये दंग' अशा तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पूरग्रस्तांनी तातडीने मदतीची अपेक्षा केली असताना, जिल्हाधिकारी मात्र डान्स करण्यात मग्न असल्याने प्रशासकीय निष्क्रियतेवर बोट ठेवले जात आहे.