Crime Pudhari
धाराशिव

Dharashiv Crime: 'तुझा मुलगा जेवला म्हणून देव कोपला', धाराशिवमध्ये जात पंचायतीने उकळला ६० हजारांचा दंड

महिलेला व तिच्या मुलाला बेदम मारहाण

पुढारी वृत्तसेवा

धाराशिव : "तुझा मुलगा आमच्या देवाच्या कार्यक्रमात जेवला, त्यामुळेच आमचा देव कोपला आणि आमच्या मुलाचा अपघात झाला," असा अजब आणि जाचक आरोप करत एका महिलेला व तिच्या मुलाला बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना धाराशिवमध्ये घडली आहे. या प्रकरणी जात पंचायत बसवून तब्बल २ लाख ५५ हजार रुपयांचा दंड ठोठावत ६० हजार रुपये वसूल केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी गायत्री शाम चव्हाण (रा. जुना बस डेपो, धाराशिव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ही घटना ६ एप्रिल रोजी घडली. आरोपी सागरबाई पवार, ज्योती पवार, ज्योतीराम पवार आणि प्रियंका पवार (सर्व रा. धाराशिव, सध्या मुक्काम मुंबई) यांनी फिर्यादीच्या मुलावर देवाच्या कोपाचा अजब आरोप केला. मुलाने देवकार्यात जेवण केल्यानेच कुटुंबावर संकट आले, असा दावा करत आरोपींनी फिर्यादी व तिच्या मुलाला जबरदस्तीने लक्ष्मी पारधी पिडी (ता. तेरखेडा) येथे नेले.

मिळालेल्या माहितीनुसार, तेरखेडा येथे जात पंचायत बसवण्यात आली होती. तिथे पंच आणि आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करत चपलेने बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे, तर या 'दोषा'साठी त्यांना दोषी धरून २ लाख ५५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. आरोपींनी फिर्यादीकडे दंडाच्या रकमेपैकी ६० हजार रुपये तात्काळ देण्याचा तगादा लावला. पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. या दहशतीमुळे फिर्यादीने आरोपींना ६० हजार रुपये दिले. अखेर या अन्यायाविरुद्ध फिर्यादीने पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली.

या प्रकरणी २० एप्रिल रोजी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २१ व्या शतकातही अशा प्रकारे अंधश्रद्धेतून जात पंचायत बसवून गरिबांना लुटण्याचे प्रकार घडत असल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT