भूम: कर्ज आणि ऊसतोड उचलीच्या पैशांवरून होणाऱ्या वादातून ग्रामीण भागात टोकाचे पाऊल उचलण्याचे सत्र सुरूच आहे. भूम तालुक्यातील उळूप येथील एका ४२ वर्षीय ऊसतोड मजुराने सावकारी पाशातून होणाऱ्या छळाला कंटाळून स्वतःचे जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रणजीत सर्जेराव सानप असे मृत व्यक्तीचे नाव असून, याप्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध या कृत्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रणजीत सानप यांनी ऊसतोडीच्या कामासाठी काही रक्कम उचल म्हणून घेतली होती. या पैशांच्या परताव्यासाठी रामेश्वर येथील औदुंबर उर्फ पिनू विष्णू दराडे हा त्यांच्याकडे सतत तगादा लावत होता. ११ मार्च २०२६ रोजी दराडे याने सानप यांना रामेश्वर येथे बोलावून घेतले. तिथे त्यांना तासनतास बसवून ठेवत पैशांसाठी मानसिक त्रास दिला, तसेच शारीरिक मारहाणही केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
आरोपीकडून होणारा सततचा जाच, शारीरिक मारहाण आणि सार्वजनिक अपमान सहन न झाल्याने रणजीत सानप यांनी टोकाचे पाऊल उचलले. १२ मार्च रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास बरहाणपूर शिवारातील एका शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.
या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जोपर्यंत संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात घेतला. अखेर सायंकाळी पोलिसांनी गुन्हा नोंदवल्यानंतर नातेवाईकांनी पार्थिव ताब्यात घेतले. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीगणेशा कनगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय झराड करत आहेत.