नळदुर्ग : नगरपालिकेचा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा तीन लाख ६३ हजार ४२४ रुपये शिल्लकी अंदाजपत्रक विशेष सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. नगराध्यक्ष बसवराज धरणे यांच्या अध्यक्षतेखाली परिषद सभागृहात ही बैठक पार पडली.
बैठकीत लेखापाल श्री. माने यांनी अंदाजपत्रक वाचून दाखविले. प्रारंभिक शिल्लक आठ कोटी २२ लाख ५० हजार २०९ रुपये असून महसुली जमा आठ कोटी ६९ लाख ३५ हजार रुपये तर भांडवली जमा एक अब्ज ११ कोटी ८१ लाख रुपये इतकी दर्शविण्यात आली. महसुली खर्च दहा कोटी १४ लाख ६१ हजार १८५ रुपये तर भांडवली खर्च एक अब्ज १८ कोटी ५४ लाख ६० हजार ७०० रुपये अपेक्षित आहे. एकूण जमा व खर्चानंतर तीन लाख ६३ हजार ४२४ रुपये शिल्लक राहणार असल्याचे सादर करण्यात आले.
अंदाजपत्रकात दिव्यांग, महिला व बालकल्याण तसेच आर्थिक दुर्बल घटकांसाठी प्रत्येकी पाच टक्के तरतूद करण्यात आली आहे. खंडोबा यात्रेसाठी पाच लाख, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समितीसाठी सहा लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. अमृत २.० पाणीपुरवठा योजनेसाठी १४ कोटी ६ लाख ५० हजार रुपयांची तरतूद असून महाराष्ट्र सुवर्ण जयंती महा नगरोत्थान अभियान, रमाई आवास व प्रधानमंत्री आवास योजनेसाठीही निधी दाखविण्यात आला आहे. अग्निशमन सुरक्षा अभियान व सुशोभीकरणासाठीही तरतूद करण्यात आली. बैठकीस उपनगराध्यक्ष नय्यर जहागिरदार, भाजप गटनेते दत्तात्रेय दासकर, काँग्रेस गटनेते मारुती खारवे यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. कार्यालयीन अधीक्षक श्री. काकडे यांनी सहाय्य केले.